जॅान्सन अँड जॉन्सन प्रा.लि या बहुराष्ट्रीय कंपनीने उत्पादित केलेल्या ‘जॉन्सन बेबी पावडर’ या सौंदर्य प्रसाधनाचा उत्पादन परवाना कायमचा रद्द करण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने केली आहे.

या प्रसाधनांचे नमुने प्रशासनाच्या नाशिक व पुणे येथील औषध निरीक्षकांनी गुणवत्ता चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर उत्पादन पद्धतीमध्ये दोष असल्याचे कारण देत हा परवाना रद्द करण्यात आला आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरने बाजारात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. गेल्या काही वर्षांत कंपनीच्या बेबी पावडर उत्पादनावर कॅन्सरचे अनेक आरोप झाले. त्यामुळे कंपनीच्या उत्पादनांच्या विक्रीतही लक्षणीय घट झाली होती.

त्यानंतर जॉन्सन अँड जॉन्सनने एक मोठी घोषणा केली आहे. 2023 पासून टॅल्कम पावडरचं उत्पादन बंद करणार असल्याचं कंपनीने जाहीर केलं होत. टॅल्कम पावडर उत्पादनाविरोधातल्या खटल्यांमुळे अडचणीत आल्याने हा निर्णय घेतल्याचे कंपनीने कारण दिले होते.