सध्याच्या काळात अनेकांचे काम लॅपटॉपवरच असते. याशिवाय मोबाईल, टीव्ही यांचाही अतिरेकी वापर वाढला आहे. यामुळे डोळ्यांवर ताण वाढतो. अधिक काळ कोणत्याही स्क्रीनकडे पाहत राहिल्याने डोळ्यांना त्रास होतो. डोळे दुखणे, अंधुक दिसणे, डोळे कोरडे पडणे, डोळ्यात काहीतरी सलने किंवा टोचल्यासारखे वाटणे यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत. डोळ्यांच्या समस्या जरी असल्या तरी सध्याच्या काळात स्क्रीनवर काम केल्याशिवायही पर्याय नाही. त्यामुळे डोळ्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी उपाय करावे लागतील त्यासाठी योगासने नक्कीच मदत करतात. समकोनासन, त्राटक, हलासन ही योगासने डोळ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी मदत करतात.

समकोनासन
प्रथम ताठ उभे रहा. यानंतर दोन्ही हात वर करा आणि हाताचे तळवे एकमेकांना जोडा. यानंतर कंबरेतून खाली वाका. शरीर ९० अंशात वाकवा.
दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता सरळ ठेवा. मान खाली करा आणि डोळे जमिनीवर स्थिर ठेवा. अर्धा ते १ मिनिट यास्थितीत थांबा.

त्राटक
दिवा किंवा मेणबत्ती पेटवा आणि ती डोळ्यांच्या अगदी सरळ रेषेत ठेवा. तुमचे डोळे आणि दिवा एका समान पातळीवर असायला हवा. यानंतर ध्यान मुद्रेत बसा. दोन्ही हातांच्या तर्जनीला दोन्ही हातांचे अंगठे लावा आणि अशी मुद्रा घालून हात गुडघ्यावर ठेवा. या ध्यानमुद्रेत बसून समोर दिसणाऱ्या दिव्याच्या ज्योतीकडे लक्ष केंद्रित करा. पापण्यांची हालचाल न करता एखादा मिनीट एकटक दिव्याकडे बघा. थोडा वेळ थांबून पुन्हा हीच कृती ४-५ वेळा करा.

हलासन
सगळ्यात आधी पाठीवर झोपा. त्यानंतर दोन्ही पाय एकत्रितपणे ९० अंशात वर उचला. यानंतर दोन्ही हात कंबरेखाली घ्या आणि कंबरेचा भाग देखील उचलण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय सावकाशपणे डोक्याच्या मागे घेऊन जा आणि पायाची बोटे जमिनीवर टेकविण्याचा प्रयत्न करा. एक मिनिट या स्थितीत रहा, श्वासावर लक्ष केंद्रित करा, श्वास बाहेर टाकताना पाय परत जमिनीवर आणा.