एकादशी किंवा इतर उपवासाला साबुदाणा (Sago) हा आवर्जून खाल्ला जातो. यापूर्वी साधारणपणे साबुदाणा खिचडी खाल्ली जायची. आता साबुदाण्यापासून आप्पे, खीर, थालीपीठ यांसारखे अनेक पदार्थ बनवले जाऊ लागले आहेत. साबुदाण्याला स्वतःची अशी खास चव नसते. पण तो खिचडी, खिर, पापड, वेफर्स, वडे अशा वेगवेगळ्या स्वरुपात बनवला जातो, तेव्हा त्याला खास चव येते. मात्र तुम्हाला माहित आहे का साबुदाणा हा भारतीय पदार्थ नाही. मग उपवास आणि साबुदाणा खाणे यामागचं कारण काय असेल. साधारणपणे कधीपासून उपवासाला साबुदाणा खाल्ला जाऊ लागला याविषयी जाणून घेऊया माहिती –

उपवासाला साबुदाणा का चालतो ?

साबुदाणा हा प्रोटीन, फायबर आणि कॅल्शियमने परिपूर्ण असा पदार्थ आहे. त्यात पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असतं. टॅपिओका या वनस्पतीच्या कंदांपासून साबुदाणा बनवला जातो. आपल्याकडे उपवासाच्या दिवशी फक्त कंदमुळं खावीत असं सांगतात. त्यावरून टॅपिओका हे एक प्रकारचं कंदमूळ आहे आणि त्यापासूनच साबुदाणा बनवला जातो. म्हणून उपवासाला साबुदाणा खाण्याची सुरुवात करण्यात आली.

टॅपिओका हे झाड मूळचं दक्षिण अमेरिकेतलं असलं तरी भारतात ते युरोपीयन लोकांनी आणलं. व्यापाराच्या उद्देशाने युरोपीय लोक वेगवेगळ्या देशांमध्ये गेले. त्यांनी वेगवेगळ्या देशात वेगवेगळी पिके, खाद्यपदार्थ न्यायला सुरुवात केली. त्यांनीच टॅपिओका वनस्पती भारतात आणली. या वनस्पतीला वाढायला दमट वातावरण लागतं, ते वातावरण भारतात होतं, म्हणून भारतात केरळ राज्यात याची लागवड सुरु झाली. साबुदाण्याचे कंद टॅपिओकाची भारतात मुख्यतः तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश येथे शेती केली जाते. भारतात तामिळनाडूच्या सेलममध्ये पहिला साबुदाणा बनवण्याचा कारखाना सुरु झाला. आणि मग याचा हळूहळू प्रसार झाला. भारतीयांना याची चव आवडली आणि उपवासाला साबुदाणा घराघरात बनू लागला.

साबुदाणा कसा बनवतात

सर्वात आधी शेतातून आणलेल्या टॅपिओका कंदांना आधी पाण्यात उकळवून धुतात.
धुतलेल्या कंदांचे ६ ते ८ इंच तुकडे केले जातात आणि त्याचे वरचे आवरण काढले जाते.
कंद स्वच्छ करून कुस्करले जातात आणि त्यातले तंतू बाजूला काढले जातात. या कंदांमधून पांढरा रस काढला जातो. तो पाण्यात मिसळून त्यातल्या अशुद्धी दूर करण्यात येतात. त्यासाठी तो मोठ्या टाक्यांमध्ये ठेवला जातो. त्यानंतर पांढरा लगदा मिळविण्यासाठी हे पाणी काढून टाकले जाते आणि याच पांढऱ्या भुकटीपासून मशीन मध्ये गोलगोल दाणे बनवले जातात. नंतर हे दाणे तव्यावर भाजले जातात, जेणेकरून त्यातलं पाणी निघून जाईल. नंतर हे दाणे उघड्यावर सूर्यप्रकाशात सुकविण्यासाठी सोडले जातात.
मग या साबुदाण्यांना पॉलिश करून पॅक केलं जातं.