दिवसा आपल्या शरीराची पचनक्रिया सुरळीत आणि वेगाने सुरु असते. सकाळी केलेले जेवण ८ तासांमध्ये पचते तर, झोपल्यानंतर शरीराची पचनक्रिया संथ गतीने होते. यामुळे रात्रीचे जेवण पूर्ण पचण्यासाठी १२ ते १४ तास लागतात. म्हणून सकाळच्या जेवणानंतर साधारणपणे ८ तासांनी सायंकाळी तर, सायंकाळच्या जेवणानंतर साधारणपणे १२ ते १४ तासांनी सकाळचे जेवण घ्यावे.
आयुर्वेदानुसार जेवणाची आदर्श वेळ सकाळी ९ ते १० आणि सायंकाळी ५ ते ६ आहे. मात्र बदललेल्या जीवनशैलीमध्ये जेवणाच्या या वेळा पाळणे शक्यच नाही. जेवणाची वेळ सकाळी ११ ते १२ आणि संध्याकाळी ७ ते ८ ठेवावी. सकाळी न्याहारी ७ ते ८ : ३० वाजेपर्यंत करावी तर, दुपारचा अल्पहार शक्यतो २ ते ४ दरम्यान करावा. अल्पहार हा कमी प्रमाणातच हवा अन्यथा पोटभरून खाल्ल्याने जेवणाच्या वेळी भूक राहणार नाही.
आपण जेव्हा जेव्हा खातो तेव्हा मेंदूतून इन्सुलिन प्रसवते. त्यामुळे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते. त्यातून शरीरात फॅट्स वाढतात. परिणामी वजन वाढू शकते. त्यामुळे सारखे थोडे थोडे खात राहण्यापेक्षा जेवणाच्या योग्य वेळा पाळाव्यात. झोप मेंदूसाठी फार आवश्यक आहे. चांगल्या झोपेसाठी दुपारी १२ नंतर कॉफी आणि सायंकाळी ५ नंतर चहा घेऊ नये.
टीप – वरील लेख केवळ माहितीसाठी आहे. बदललेल्या जीवनशैलीमूळे प्रत्येकालाच या जेवणाच्या वेळा पाळणे शक्य नाही. आपल्या शरीर प्रकृतीनुसार आणि जीवनशैलीनुसार आहार आणि जेवणाच्या वेळा पाळाव्यात.