झोप चांगली झाली तर मन आणि शरीर व्यवस्थित राहून दिवस चांगला जातो. आपल्या शरीरासाठी 7-8 तासांची झोप पुरेशी असते. त्यामुळे चांगली झोप झाली तर आपले आरोग्यही चांगले राहते. मात्र आजकाल दगदग, ताण-तणाव, लॅपटॉप-मोबाईलचा अधिक वापर यामुळे अनेकांना शांत झोप लागत नाही. योगासने करणे हा या समस्येवर एक महत्वाचा आणि खात्रीशीर उपाय आहे. जाणून घ्या शांत झोप येण्यासाठी कोणती योगासने करावीत
१) सर्वांगासन
हे आसन झोपायच्या आधी काही वेळ करा. त्यानंतर शांत आणि लवकर झोप लागते.
आसन करण्याची पद्धत
सुरूवातीला चटईवर झोपा. त्यानंतर तुमचे पाय भिंतीला लावून वर नेण्याचा प्रयत्न करा. आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा खांद्यावर येईल अशा स्थितीत थांबा. 30 सेकंद अशाच स्थितीत थांबा. नंतर मूळ स्थितीत या. थोड्या वेळाने पुन्हा याचा प्रयत्न करा. या आसनाचा आणखी एक फायदा म्हणजे चेहऱ्यावरील सुरकुत्या गायब होतात.
२) वज्रासन
या आसनाचा फायदा म्हणजे तणाव आणि चिंता कमी होते. त्यामुळे चांगली झोप लागण्यास मदत होते.
आसन करण्याची पद्धत
पाय दुमडून गुडघ्यावर बसा. नंतर तुमचे हात गुडघ्यांवर ठेवा. डोके सरळ राहिल हे लक्षात ठेवा. नंतर श्वासावर लक्ष द्या. श्वास घ्या आणि सोडा. डोळे बंद करून फक्त आणि फक्त श्वासावर लक्ष ठेवा. हे आसन तुम्ही सुरूवातीला १० मिनिटं करा. नंतर वेळ वाढवू शकता.
३) मकरासन
मकरासन करण्यासाठी चटईवर पोटावर झोपा. नंतर हात क्रॉस करा. आता मनगटावर कपाळ ठेवा. नंतर डोळे बंद करा आणि श्वास घ्या, सोडा. काही वेळ असंच थांबा.
४) भ्रामरी प्राणायम
मांडी घालून बसा किंवा पद्मासनात बसा.
नंतर अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करावे आणि बाकी बोटांनी डोळ्यांना झाकून डोळे बंद करावेत.
आता मोठा श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडताना ‘म’ चा स्वर काढत भुंग्यासारखं गुणगुणण्याची क्रिया करावी.
आवाज मेंदूत गुंजत राहील अशा प्रकारे मन एकाग्र करा.