पावसाळ्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जाणून घ्या पावसाळ्यात स्वतःची, आरोग्याची, अन्नधान्यांची, कपड्यांची काळजी कशी घ्यावी यासाठी काही टिप्स –

अशी घ्या स्वतःची काळजी

स्वतःला कोरडं ठेवा
पावसाळ्यात भिजणं आणि त्यानंतर आजारी पडणं हे टाळण्यासाठी छत्री किंवा रेनकोट स्वत:सोबत बाळगा आणि स्वतःला कोरडं ठेवा.
तुमचे पाय कोरडे ठेवण्यासाठी आणि पावसाच्या पाण्यापासून आणि डबक्यांपासून संरक्षण करण्यासाठी वॉटरप्रूफ शूज किंवा बूट जरुर घाला.

पुरेसे पाणी प्या
हवामान थंड किंवा ओलसर वाटत असले तरीही पुरेसे पाणी प्यावे.

वॉटरप्रूफ बॅग वापरा
पावसाच्या पाण्यामुळे तुमच्या वस्तूंचे, विशेषतः इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे संरक्षण करण्यासाठी वॉटरप्रूफ बॅग किंवा पर्स वापरा.

कोमट पाण्याने अंघोळ करा
पावसाळ्यात त्वचा खूप लवकर कोरडी होते. त्यामुळे आंघोळीसाठी गरम पाण्याऐवजी कोमट पाणी वापरा.

अन्नधान्याची अशी घ्या काळजी

तांदूळ
पावसाळ्यात भातामध्ये किडींचा प्रादुर्भाव झाला तर प्रथम ते घट्ट डब्यात ठेवावे. एका टिश्यूमध्ये आले, लसूण आणि वेलची घालून भाताच्या मध्यभागी ठेवा. त्यामुळे भातामध्ये किडे येण्यास प्रतिबंध होईल.

केळी
प्रथम केळी पाण्याने धुवा आणि नंतर टिश्यू पेपरने स्वच्छ करा. यानंतर टिश्यू पेपर ओला करून देठावर गुंडाळा, यामुळे केळी लवकर खराब होणार नाहीत.

टोमॅटो
पावसाळ्यात टोमॅटो सर्वाधिक कुजतात. टोमॅटोला सडण्यापासून वाचवण्यासाठी टोमॅटोच्या टोकाला टेप लावून झाकून ठेवा. असे केल्याने टोमॅटोमध्ये ओलावा राहणार नाही आणि ते जास्त काळ टिकतील.

कपड्यांची अशी घ्या काळजी

पावसाळ्यात डिचर्जंट पावडरमध्ये थोडासा बेकिंग सोडा घाला. यामुळे कपड्यांचा वास तर जाईलच पण त्याशिवय कपडे अधिक स्वच्छ आणि निर्जंतुक व्हायला मदत होईल.
पावसाळ्यात कपडे सुकत घालण्यासाठी कपड्यांचा स्टॅन्ड वापरू शकता. कपड्यांच्या स्टॅन्डवर कपडे सुकत घालून तो स्टॅन्ड पंख्याखाली ठेवला की पंख्याच्या वाऱ्यावर कपडे लवकर सुकतात.
अनेकदा पावसाळ्यात कपडे अर्धवट सुकतात. अशावेळी अर्धवट सुकलेल्या कपड्यांवर इस्त्री फिरवली की ते लगेच सुकतात.

कीटक, डासांपासून करा संरक्षण

बाल्कनीमध्ये, कुंड्यांमध्ये पाणी साचणार नाही. याची काळजी घ्या म्हणजे डास जास्त येणार नाहीत.अस्वच्छता असेल तर डास जास्त येतात. त्यामुळे घरात व घराच्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता ठेवा.
पावसाळ्यात नारळाचं तेल व कडुनिंबाचं तेल एकत्र करून ते जाळल्यानं डास घरातून निघून जातात. त्याच्या वासामुळे डास घरात येत नाहीत. तेलांचं हे मिश्रण शरीरावर लावल्यामुळेही डास जवळ येत नाहीत.
कडुलिंबाचे तेल कीटकांना दूर ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे. कडुलिंबाचे तेल पाण्यात मिसळून घराभोवती शिंपडा.
कीटकांना लवंगीचा वास आवडत नाही. लवंग पाण्यात उकळून घरात ठेवा किंवा कपड्यात बांधून घराच्या कानाकोपऱ्यात ठेवा.