उन्हाळा सुरु झाला की टीव्हीवर विविध प्रकारच्या कोल्ड्रिंक्सच्या जाहिराती सुरु होतात. याचा जनमनावर कुठेतरी परिणाम होतोच. लहान मुलेही टीव्ही पाहून कोल्ड्रिंक्सचा हट्ट करतात. तसेच झटपट मिळतात म्हणून नैसर्गिक पेय पिण्या ऐवजी कृत्रिम शीतपेय पिण्याकडे लोकांचा कल जास्त असतो. उन्हाळ्यात थोडे कोल्ड्रिंक्स पिल्याने लगेच कुठे शरीरावर परिणाम होणार अशी सामान्य माणसाची धारणा असते. मात्र कोल्ड्रिंक्स पिण्याचे आपल्या शरीरावर हानिकारक परिणाम होतात. जाणून घ्या कोल्ड्रिंक्समुळे शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात –
पचनसंस्थेवर परिणाम होतो
अनेक जणांचा असा समज असतो जेवणानंतर कोल्ड्रिंक्स घेतल्याने पचन व्यवस्थित होते. मात्र हा चुकीचा समज आहे. कोल्ड्रिंक्समध्ये शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक नसतात. तसेच साखर, सोडा, आम्ल आणि इतर शरीराला हानिकारक असणारे घटक असतात. त्यामुळे कोल्ड्रिंक्सच्या अतिसेवनाचा पचनसंस्थेवर परिणाम होतो.
कोल्ड्रिंक्स कृत्रिमरीत्या थंड बनवलेली असतात. शरीराचे आणि कोल्ड्रिंक्सचे तापमान यात तफावत असल्यानेही कोल्ड्रिंक्सच्या अतिसेवनाचा पचनसंस्थेवर परिणाम होतो. पचनक्रिया मंदावते. त्यामुळे शरीरात चरबी वाढते.
हाडे आणि दातांवर परिणाम होतो
वयाच्या तिशीनंतर साधारण शरिरात हाडांच्या निर्मितीची प्रक्रिया बंद होत जाते. त्यामुळे खाद्यपदार्थांमधील आम्लतेच्या प्रमाणानुसार हाडे दुर्बल,ठिसूळ होण्यास प्रारंभ होतो. कोल्ड्रिंक्समध्ये पीएच सामान्यतः ३.४ असते. त्यामुळे हाडे आणि दात ठिसूळ आणि दुर्बल बनतात. दातांवरचा एनॅमलचा थर कोल्ड्रिंक्सच्या अति सेवनामुळे कमी होतो.
वजन वाढते
कोल्ड्रिंक्समध्ये साखरेचं प्रमाण जास्त असल्याने रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण वाढतं. त्यामुळे कोल्ड्रिंक्सच्या अतिसेवनाने वजन वाढून लठ्ठपणा येण्याची शक्यता वाढते.