साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुढी उभारली जाते. गुढीभोवती लिंबाचा पालाही गुंडाळला जातो. तसेच या दिवशी अनशापोटी कडुलिंबाचा पाला खाण्याची पद्धत काही ठिकाणी रूढ आहे. जाणून घ्या गुढीपाडव्याला कडुलिंबाचा पाला का खाल्ला जातो

जंतुनाशक
अँटिबायोटिक घटकांनी समृद्ध कडुलिंबाला सर्वोच्च औषध म्हणून ओळखले जाते. कडुलिंब जंतुनाशक असल्याने घरात येणाऱ्या रोगजंतूंना अटकाव होतो आणि कडुलिंबाची पाने खाल्ल्याने आरोग्यही चांगले राहाते.

रोगप्रतिकार शक्ती वाढते
होळी झाल्यानंतर वातावरणात उष्णता वाढायला लागते. यामुळे कांजण्या, गोवर, पोटाचे विकार,सर्दी, घसादुखी यांसारखे आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात कडुलिंबाचा पाला खाऊन करतात.

कडुलिंबाचे इतर आरोग्यदायी फायदे

मधुमेह रुग्णांसाठी गुणकारी
कडुलिंबाच्या सेवनाने रक्तातील साखर व इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणास राहण्यास मदत होते.

पोटाच्या विकारांवर गुणकारी
कडुलिंबाचा पाला खाल्ल्याने पोटातील जंत दूर होतात.

दातांचे आरोग्य चांगले राहते
कडुलिंबाच्या दातूनने दात स्वच्छ होतात. कडुलिंबाच्या पानांचा काढा बनवून त्याने गुळण्या केल्यास दात आणि हिरड्या निरोगी राहतात. मुखदुर्गंधी येत नाही.

त्वचेसाठी वरदान
i. कडुलिंबाच्या तेलात थोडासा कापूर मिसळून शरीरावर मालिश केल्याने त्वचेचे रोग बरे होतात.
ii. खाज किंवा खरूज झाली असेल तर कडुलिंबाची पाने दह्यासह वाटून लावल्याने तात्काळ आराम मिळतो.
iii. कडुलिंबाच्या पानाची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
iv. शरीराला खाज येण्याची समस्या असल्यास, आंघोळीच्या पाण्यात निंबोळी पाने घालून स्नान करावे.

जुन्या जखमा बऱ्या होतात
ऑलिव्ह ऑईल बरोबर कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून लावल्यास जुन्या जखमा बऱ्या होतात.

वेदनाशामक
विंचू, गांधीलमाशी यासारखे विषारी कीटक चावले तर कडुलिंबाची पाने बारीक वाटून चावलेल्या जागी लेप बनवून लावा. त्यामुळे विष पसरत नाही. तसेच आराम मिळतो.