जागतिक आरोग्य संघटनेकडून एमपॉक्स साथीला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केलं आहे. जगातील 116 देशांमध्ये एमपॉक्स विषाणूचा प्रसार झाला आहे. या आजारात रुग्णाच्या शरीरावर पुरळ उठतात.

कोरोनाच्या साथीतून जग नुकतच सावरलं असताना एक नवीन संकट जगासमोर उभं आहे. एमपॉक्स हा विषाणूचा प्रसार जगभर होताना दिसतोय. जगातील 116 देशांमध्ये या विषाणूचा प्रसार झाला आहे. त्यामुळं जागतिक आरोग्य संघटनेकडून एमपॉक्स विषाणूच्या साथीला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून  घोषित केलं आहे.

1958 मध्ये एमपॉक्स हा विषाणू माकडांमध्ये सापडला होता. त्यानंतर तो माणसांमध्ये पसरला. आधी या विषाणूला मंकीपॉक्स असं म्हटलं जायचं.

आफ्रिकेतील काँगो या देशामध्ये आतापर्यंत 14 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. 500 हून अधिक लोकांचा या साथीत बळी गेला आहे. या आजारात संसर्ग झाल्यावर अंगावर पुरळ येतात.  अशा वेळी रुग्ण पूर्णपणे बरा होईपर्यंत त्याने इतरांपासून दूर राहावे असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे.


मंकीपॉक्स आजाराची लक्षणे
रुग्णाच्या अंगावर लाल   पुरळ येणे (2 ते 4 आठवडे)
ताप, घसा खवखवणं, डोकेदुखी, स्नायू दुखणे, पाठदुखी,  थकवा
लिम्फ नोड्स सुजणे

संक्रमित रुग्णाची लवकर ओळख पटवून व्हायरस नियंत्रित केला जाऊ शकतो. या आजाराच्या लशी उपलब्ध आहे. एमपॉक्स असलेले बहुतेक लोक पूर्णपणे बरे होतात, परंतु काही गंभीर आजारी होऊ शकतात.  2022 मध्ये देखील या विषाणूचा वेगाने प्रसार झाला होता. त्यावेळी 100 देशांमध्ये हा विषाणू पसरला होता. 200 हून अधिक लोकांचा त्यावेळी मृत्यू झाला होता.