मासिक पाळी ही एक सामान्य आणि नैसर्गिक घडणारी गोष्ट आहे. मात्र याविषयी समाजात अजूनही खूप गैरसमज आहेत. अजूनही काही ठिकाणी स्त्रियांना या कालावधीत समजून घेण्याऐवजी हिनतेची वागणूक दिली जाते आणि ही वागणूक देताना पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त अग्रेसर आहेत. काही ठिकाणी मासिक पाळी आलेल्या स्त्रिला वेगळं बसवलं जात. मासिक पाळीविषयी अजूनही कुजबुजीच्या स्वरूपात बोललं जातं.

मासिक पाळी ही निसर्गाने दिलेली देणगी आहे. मात्र या देणगी सोबतच काही शारीरिक आणि मानसिक त्रास ही स्त्रियांना मिळाला आहे. पोट दुखणं, चिडचिड होणं, उदास वाटण, उलट्या मळमळ होणं, अंग दुखणं यांसारखे अनेक त्रास या चार दिवसात स्त्रियांना होतात. घरातील स्त्रिला होणारा त्रास दिसूनही घरातील मंडळी एक तर दुर्लक्ष करतात किंवा तटस्थ भूमिका घेतात. या चार दिवसात स्त्रिला थोडा मानसिक आधार आणि आराम दिला तर तिच्या वेदना नक्कीच कमी होतील.

एखाद्या स्त्रिला मासिक पाळी आली असताना घरातील लोकांनी काय जबाबदारी पार पाडावी हे आपण पाहणार आहोत.

1. मासिक पाळी दरम्यान प्रचंड चिडचिड होत असते. त्यामुळे तिची मानसिक अवस्था समजून घेण्याचा प्रयत्न करा. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा.

2. उगाच घरात तिला बाजूला थांब, इथं हाथ नको लावू, तिथं हाथ नको लावू करू नका.

3. घरातील पुरुषांनीही या गोष्टीकडे जगावेगळी घटना किंवा आपल्याला बायकांच्या दुखण्याचं काय करायचा असा विचार करण्याऐवजी घरातील स्त्रिया पाळीबद्दल मोकळेपणाने बोलू शकेल असं चांगलं वातावरण तयार करा.

4. सॅनिटरी नॅपकिन किंवा लागणारी औषधे आणून देण्याची लाज बाळगू नका. तिला कामाच्या ऑर्डर देण्याऐवजी छोट्या छोट्या गोष्टींत मदत करा.

5. पाळीचा त्रास होतानाही स्त्रियांना घरातील सगळी कामे करावी लागतात. निदान या दिवसांमध्ये तरी तिला थोडा अराम द्यावा.

6. घरातील लहान मुलीला पाळी आली असेल तर, घरातील मुलींना ‘पाळी’ विषयी योग्य आणि शास्त्रीय ज्ञान द्यावे. पाळी आली या कल्पनेनेच मुली घाबरलेल्या असतात त्यांना धीर द्यावा. तसेच या काळात काय खबरदारी घ्यावी यांविषयी माहिती द्यावी. मुलीला पाळीविषयी समजावणे ही केवळ आईची जबाबदारी नाही. वडिलांनीही तिला जमेल तस अश्वस्त करण्याचा प्रयत्न करावा.