महाराष्ट्रात सण साजरे करण्यामागे सामाजिक, वैज्ञानिक आणि नैसर्गिक दृष्टिकोन असतो. काही सण ऋतुमानानुसारही साजरे केले जातात. असाच एक सण म्हणजे मकरसंक्रांत. सूर्य मकर राशीतून मार्गक्रमण करतो म्हणून मकर संक्रांत असे म्हटले जाते. शिवाय या दिवसापासून थंडीच्या काळात लहान वाटणारा दिवस हळू हळू मोठा होवू लागतो. संक्रमण किंवा मार्गक्रमण याला संक्रांत असे म्हणतात.
महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. पहिला दिवस भोगी, दुसरा दिवस मकरसंक्रांत आणि तिसरा दिवस किक्रांत म्हणून साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी बनवली जाते. हिवाळ्यात थंड वातावरण असल्यामुळे शरीराला उष्णता आणि ऊर्जेची आवश्यकता असते. शरीराची ही गरज पूर्ण व्हावी म्हणून भोगीच्या दिवशी मिक्स भाज्या बनवल्या जातात. वांगे, गाजर, हरभरा, घेवडा, तीळ आणि शेंगदाणे यांसारख्या हिवाळ्याच्या काळात मिळणाऱ्या सर्व ताज्या भाज्यांचा वापर भोगीच्या भाजीत केला जातो. तसेच तीळ लावलेली बाजरीची बकरी बनवतात. या मिक्सभाजीमुळे शरीराला उष्णता आणि ऊर्जा मिळते.
भोगीला अनेक भाज्या बनवण्याची प्रथा असल्याने शेतकरी देखील या काळात आपल्या शेतात विविध प्रकारच्या भाज्या घेतात. परिणामी निसर्ग संपन्नेत विविध पिकांची भर पडते.