आरोग्य आणि संपत्ती या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. उत्तम आरोग्य असेल तर संपत्तीचा उपभोग घेता येतो आणि आरोग्य चांगले नसेल तर संपत्ती खर्च करावी लागते. आजकाल वाढलेले आजारपण आणि त्याहूनही अधिक वाढलेला वैद्यकीय खर्च यांचा ताळमेळ बसणं अवघड जात आहे. कधी कधी अचानक आरोग्याच्या मोठ्या समस्या उद्भवतात आणि मग मोठी हॉस्पिटलची बिल भरावी लागतात. त्यासाठी पैशांची खूप जमवाजमव करावी लागते. अशा वेळी आरोग्य विमा असेल तर आर्थिक गोष्टींचा अधिक ताण येत नाही. त्यामुळे आवश्यकतेनुसार आणि सोयीनुसार विमा काढून घ्यावा. जाणून घ्या आरोग्य विम्याची गरज का वाढली आहे. हेल्थ इन्शुरन्स, मेडिकल पॉलिसी किंवा मेडिक्लेम अशा अनेक नावांनी आरोग्य विमा ओळखला जातो.
आरोग्य विम्याची गरज
1.अपघात, आजार ताणतणाव मोठ्या प्रमाणत वाढले आहेत आणि यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय सोयीसुविधांची कमतरता नसली तरी त्या प्रचंड खर्चिक आहेत. अशा अडचणीच्या वेळी आरोग्य विमा मदतीला येतो.
2. एखाद्या दीर्घकाळ आजारी असलेल्या व्यक्ती किंवा अपघातात झालेल्या व्यक्तींवरील उपचारासाठी असा आरोग्य विमा उपयोगी येतो. पैसे हातात नसतानाही शेवटच्या क्षणीदेखील हॉस्पिटलमध्ये कॅशलेस हॉस्पिटलायझेशन म्हणजे पैसे न भरताही भरती करता येणं, तिथल्या उपचारांचा खर्च मिळणं हा आरोग्य विम्याचा महत्त्वाचा फायदा आहे.
आरोग्य विमा काढताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या
1.प्रत्येकाकडे स्वत:चा खासगी विमा असणे गरजेचे. नोकरी संपल्यावर किंवा सुटल्यावर विमा संरक्षण हवेच. तुम्ही नोकरी बदलली तर तुमचे विमा संरक्षण कंपनी ताबडतोब काढून घेते.
2.विमा घ्यायच्या आधी विमा कंपनीची नीट माहिती मिळवा.
3.प्रत्येक कंपनीचा हेल्थ प्लॅन हा वेगवेगळा असतो आणि प्रत्येक प्रकारच्या विमा पॉलिसीमधील नियम-अटी या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे प्रथमच आरोग्य विमा खरेदी करताना या नियम-अटी संपूर्ण वाचणं हे अत्यंत गरजेचं आहे.
4.विमा घेताना आजच्या खर्चावर पुढे महागाईमुळे होणारी वाढ याचा ताळमेळ घालून मग निर्णय घ्यावा.
5.आपल्या कुटुंबातील आजार, आपलं राहणीमान व आपली जीवनशैली, आपली आíथक क्षमता यानुसार तुम्ही तुम्हाला किती रकमेचा आरोग्य विमा काढायचा आहे हे ठरवून पॉलिसी घ्यावी.
6.विमा घेताना असलेले आजार लपवू नका. अन्यथा तुम्हाला त्या आजारासाठी त्या पॉलिसीचे पैसे मिळताना अडचणी निर्माण होतील.
7.आरोग्य विम्याच्या पॉलिसीच्या नेटवर्कमध्ये कोणती हॉस्पिटल्स समाविष्ट आहेत हे जाणून घ्या. या यादीत समाविष्ट नसलेल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची वेळ आल्यास काय करायचे याची देखील चौकशी करावी.
8.काही पॉलिसीज्मध्ये को-पेमेंट म्हणजे विमाधारकानेही क्लेमच्या रकमेतील काही टक्के रक्कम भरावयाची असते. तुम्हाला अशी पॉलिसी हवी आहे का, याचा आधी विचार करा. हॉस्पिटलच्या खर्चाचा क्लेम विमा कंपनी आपल्याला पूर्ण देईल, असा काहींचा समज असतो. मात्र काही पॉलिसींमध्ये हा क्लेम हॉस्पिटलमध्ये तुम्ही कोणत्या प्रकारच्या रुममध्ये राहणार आहात यावर ठरलेला असतो. ज्याला रुम रेंट सबलिमिट म्हणतात. तुम्ही खूप महागडय़ा रुममध्ये राहिलात तर बाकी सेटलमेंट त्यानुसार ठरवली जाते. याचीही माहिती आधी काढून ठेवा.
9.साधारणपणे वयाच्या चाळिशीपर्यंत कव्हर घ्या. त्यामुळे पुढची काही वर्षे ‘नो क्लेम बोनस’ मिळून तुमचे विमा कव्हर आपोआप वाढेल.
10.आरोग्य विम्याचा प्रीमियम वय आणि आरोग्य जोखीम यासह अनेक घटकांवर अवलंबून असतो. वृद्ध लोकांच्या तुलनेत तरुणांमध्ये आरोग्याचा धोका कमी असतो. त्यामुळे विमा कंपनीचे दायित्वही येथे कमी होते. जर तुम्ही तरुण वयात आरोग्य विम्याची निवड केली तर तुम्हाला त्यासाठी कमी प्रीमियम भरावा लागेल.
11. विशेष महत्वाचे म्हणजे पॉलिसी एजंटकडून आरोग्य विम्याची पूर्ण माहिती घ्या. त्यातील प्रक्रिया, सुविधा व नियम यांचा पूर्ण तपशील जाणून घ्या. कधीही पॉलिसीचे कागद पूर्ण व काळजीपूर्वक वाचल्याखेरीज त्यांच्यावर सही करू नये.