पावसाळ्यात अनेक आजार पसरतात. शिवाय या काळात तुमची पचनशक्ती मंदावलेली असते. त्यामुळे आजारपणे येण्याची जास्त शक्यता असते. मात्र तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर आजार लांबच राहतात. पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खालील फळांचे सेवन करावे –

नारळपाणी
नारळ पाण्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशिअम असतं. पोटॅशिअम शरीरातल्या पोषक तत्वांच्या वाढीसाठी खूप आवश्यक असतं.
नारळ पाण्यात पुरेसे पोषक घटक आणि व्हिटॅमिन्स असतात. याचा परिणाम प्रतिकार शक्तीवर होतो. नारळ पाण्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते आणि आजारपणातून लवकर बरे होण्याचे बळ मिळते. शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी नारळपाणी उपयोगी ठरते. नारळ पाणी थंड असल्यामुळे शरीरात अपचन, पित्तामुळे होणारी जळजळ कमी होते. तसेच नारळ पाण्यामुळे तुमच्या शरीराची पचनशक्ती सुधारते.

संत्री
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी अत्यावश्यक असतं. दररोज एक संत्री खाल्ल्याने तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं. संत्र्यामध्ये अनेक पोषक तत्वं मुबलक प्रमाणात असतात. मुख्यत: संत्र्यात असलेल्या व्हिटॅमिन ‘सी’ आणि फायबर या घटकांची शरीराला खूप आवश्यकता असते.
संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी आणि डी सोबत कॅल्शियम देखील असते. विशेष म्हणजे डी व्हिटॅमिन शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते.त्यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी आहारात संत्रीचा समावेश करावा.

पपई
पपई हे फळ अनेक घटकांनी परिपूर्ण असल्याने शरीरासाठी अत्यंत पोषक आहे. पपईमध्ये कॅलरिज, कार्बोहायड्रेट, फायबर, प्रोटिन्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फॉलेट, पोटॅशिअम, अँटि ऑक्सिडंट, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन बी1, बी3, बी5 यांसारखे पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात.पपईमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी मुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. पचनसंस्था मजबूत करण्यासाठी नियमित पपई खावी. पपईमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आणि फायबर असते. यामुळे पचनशक्ती सुधारते.

डाळिंब
डाळिंबामुळे शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढण्यास मदत होते. अशक्तपणा दूर करण्यासाठी डाळिंब गुणकारी आहे. व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डाळिंबाचा रस पिऊ शकता.