आपले जीवन प्लास्टिकच्या वस्तू आणि त्याच्या वापराभोवतीच फिरत असते. पाणी पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बाटल्या असोत किंवा भाजी, फळे आणि इतर खाद्यपदार्थ खरेदी करणे असो, सगळं काही प्लास्टिकच्या पिशव्यांमध्येच येतं. हे आपल्याला माहिती आहे की प्लास्टिक पर्यावरणावर आणि आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करत आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का की प्लास्टिकचा वापर तुमच्या शरीरातील हार्मोन्सवरही वाईट परिणाम करतो? आजच्या या लेखामध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की प्लास्टिकचा वापर तुमच्या हार्मोन्सवर कसा परिणाम करतो. चला जाणून घेऊया हार्मोन्सवर प्लास्टिकचा काय प्रभाव होतो. (plastic affects hormones)
1. हार्मोन्सची नक्कल करणारे रसायने
बिस्फेनॉल ए (BPA) हा प्लास्टिकमध्ये आढळणारा एक सामान्य रसायन आहे, जो शरीरात एस्ट्रोजन हार्मोन्सची नक्कल करू शकतो. BPA एस्ट्रोजन रिसेप्टर्सशी बांधला जाऊ शकतो, ज्यामुळे हार्मोनल कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो आणि शरीरात हार्मोन्सचे असंतुलन होऊ शकते. तर फथालेट्स रसायन, जे प्लास्टिकला मऊ करण्यासाठी वापरले जाते, तुमच्या शरीरातील हार्मोन सिस्टमला बाधित करू शकते आणि त्यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात.
2. प्रजनन आरोग्याशी संबंधित समस्या
प्लास्टिकमध्ये हार्मोन्सला बाधित करणारे रसायने असतात, ज्यांच्या संपर्कामुळे पुरुष आणि महिलांच्या प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. महिलांमध्ये ओव्ह्युलेशन आणि पीरियड्सशी संबंधित समस्या वाढू शकतात. इतकंच नाही, प्लास्टिक काही महिलांमध्ये PCOS चे लक्षणे वाढवू शकते, ज्यामुळे अनियमित पीरियड्स आणि हार्मोनल असंतुलनाच्या समस्या वाढू शकतात.
3. थायरॉइड डिसऑर्डर
प्लास्टिकमध्ये आढळणारे BPA आणि काही फ्लेम रिटार्डंटसारखी रसायने थायरॉइड (thyroid) हार्मोन्सच्या उत्पादनात अडथळा आणू शकतात. हे चयापचय समस्यांना वाढवू शकते, ज्यामुळे ऊर्जा पातळी, वजन आणि एकूणच आरोग्यावर परिणाम होतो. या रसायनांच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने थायरॉइड डिसऑर्डरचा धोका वाढू शकतो.
4. कर्करोगाचा धोका वाढणे
प्लास्टिकमध्ये असलेल्या रसायनांच्या संपर्कामुळे काही कर्करोगाचा (cancer) धोका वाढू शकतो, विशेषत: हार्मोन्सवर अवलंबून असलेले कर्करोग, जसे की स्तनाचा कर्करोग. या रसायनांमुळे हार्मोन्समध्ये निर्माण होणारे अडथळे सेल्सच्या प्रक्रियेत बदल घडवून कर्करोगाचा धोका वाढवू शकतात.
प्लास्टिकच्या वापरामुळे होणारा धोका कसा टाळावा?
तुम्ही प्लास्टिकला पर्याय शोधू शकता, जसे की काचेच्या वस्तू, स्टेनलेस स्टील किंवा इतर नॉन-प्लास्टिक वस्तू, विशेषतः खाण्याच्या आणि पिण्याच्या कंटेनरसाठी. प्लास्टिकचा हार्मोनल आरोग्यावर होणारा परिणाम समजून घेतल्याने आणि त्याच्या वापरापासून सावध राहिल्याने तुम्ही तुमच्या एकूणच आरोग्याला सुधारू शकता.