सध्या अनेकांचं वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यामुळे अनेकजण घरी बसूनच सलग ८-९ तास काम करतात. त्यामुळे अनेकांना लॅपटॉपवर काम करताना मानदुखीचा त्रास होतो. नंतर त्याचा परिणाम सर्व शरीरावर होतो. मानदुखीच्या समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर खालील उपायांचा अवलंब करावा.

मानेचा व्यायाम
जेव्हा तुम्ही खुर्चीवर बसला असता तेव्हा काही वेळानंतर मान उजवीकडे न्या नंतर डावीकडे न्या. तसेच कधी मान खाली घ्या वर पाहा. असं दिवसातून दहा-बारा वेळा करा. त्यामुळे आराम मिळतो.

मसाज करा
जेव्हा तुम्ही झोपता त्याआधी मानेची मसाज करा. त्यामुळे मानेचे स्नायू मोकळे होतील. कोणत्याही तेलाने तुम्ही मानेची मसाज करू शकता.

झोपण्याची पद्धत बदला
झोपताना कुशीवर झोपावं नाहीतर पाठीवर झोपावं. कारण असं झोपलं तर मानेवर ताण येत नाही. महत्त्वाचं म्हणजे पोटावर झोपणं टाळावं. मान दुखत असेल तर मानेखाली उशी घेऊ नये.

मानेला शेक द्या
मान दुखत असेल तर बर्फाची पिशवी घ्या. त्याने मानेला शेक द्या. तसेच गरम पाणी घेऊनही तुम्ही मानेला शेक देऊ शकता. त्यामुळे स्नायूंना आराम मिळतो.

तणावापासून दूर रहा
तुमच्या जीवनातील तणाव कमी करा. तणाव तुम्ही अनेक पद्धतीने कमी करू शकता. त्यासाठी गाणी ऐका, बागेत फिरा किंवा आवडत्या व्यक्तीशी बोला. तणाव कमी झाल्याने मानदुखी तसेच अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते.