अति प्रमाणात शारीरिक काम करणे, सर्दी-ताप, थकवा, ताणतणाव, सांधेदुखी, डिहायड्रेशन, झोपेची कमतरता, लोह-व्हिटॅमिन डीची कमतरता यांसारख्या अनेक कारणांमुळे अंग दुखते. कोरोनामुळे अनेकांना वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे. सतत एका जागी कामासाठी बसावे लागत असल्यानेही अनेकांना अंगदुखीची समस्या निर्माण झाली आहे. अंगदुखीमुळे काम करताना मर्यादा पडतात. अंगदुखीवर तात्काळ अराम मिळावा म्हणून अनेक जण पेनकिलर टॅब्लेट घेतात. मात्र पेनकिलर टॅब्लेटची सवय लावून घेण्यापेक्षा आधी काही घरगुती उपाय करून पाहावेत.
मसाज
i) एका कपड्यात बर्फ घेऊन तुमचे अंग दुखत असेल तिथे बर्फाचा मसाज करा. बर्फ थंड लागत असला तरी देखील तो हाडांवर आणि सांध्यावर उष्णता देतो. त्यामुळे अंगदुखीवर आराम मिळतो.
ii) कोणतेही तेल घेऊन ते थोडेसे गरम करुन अंग दुखत असेल त्या जागी लावून मसाज करा. हाताने मसाज करणे जमत नसेल तर मसाजर वापरू शकता.
iii) आल्याचे साल काढून ते गरम करावे व कॉटनच्या कापडात बांधून जेथे वेदना होत असतील तेथे त्याचा १० मिनिटे शेक घ्यावा.
तेलात मोहरी तेलात लसणाच्या पाकळ्या टाकून गरम करावे आणि हे तेल गरम असताना कापडाच्या बोळ्यावर घेऊन अंग दुखत असेल तिथे लावावे.
आहार
i) फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
ii) गरम दुधात हळद टाकून प्यावी.
iii) आले, लवंगा, थोडी मिरी घालून केलेला चहा प्यावा.
योग्य व्यायाम करा
शरीराला हालचाल नसेल तर शरीर जखडून अंग दुखते. त्यामुळे शारीरिक हालचाल करावी. तज्ञांच्या सल्ल्याने, मार्गदर्शनाने व्यायाम करावेत. आजकाल युट्युबवर देखील व्यायामाचे अनेक व्हिडिओ उपलब्ध असतात. अंगदुखीच्या प्रकारानुसार व्यायाम प्रकार करावेत.
पुरेशी झोप घ्या
थकवा आणि ताणतणावामुळेदेखील अंग दुखते. पुरेशी आणि शांत झोप घेतल्याने शरीराला आराम मिळतो.
टीप – घरगुती उपायांनी जर अंगदुखीवर फरक पडला नाही तर, वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.