उकाडा सुरू झाला मी शरीराला गरज भासते की थंडगार पेयांची. उन्हाताणातून बाहेरून आले की चहा, कॉफी नकोच वाटते. आधी गारेगार पाणी किंवा सरबत पिण्याची इच्छा होते. अशा दिवसात गोळा, आइस्क्रिम असे खाण्याचीही इच्छा होते. परंतु या पेक्षा काही पारंपरिक शीतपेये घेतल्यास आरोग्यास फायदेशीर ठरते. कोणती आहेत ही पेय आणि काय आहे त्याचे फायदे आपण पाहुयात.

नारळ पाणी :
नारळ पाणी आपल्या शरीरासाठी किती औषधी आहे हे सर्वानाच माहीत आहे. नारळ पाणी म्हणजे भर उन्हाच्या दिवसात शरीरासाठी एक प्रकारे सलाईन असल्या सारखेच आहे. नारळ पाणी प्यायल्याने उन्हाळ्यात येणार थकवा दूर होतो. दोन ते तीन दिवसांतून एकदा तरी नारळ पाणी प्यावे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नारळ पाणी अतिशय गुणकारी ठरते.

उसाचा रस :
उन्हाळ्याच्या दिवसात उसाचा रस पिल्याने काही वेळासाठी आपली तहान भागते. तसेच उसामध्ये भरपूर साखर असल्याने तो पिल्यास उन्हाळ्यात थकवा दूर होण्यासही मदत होते. तसेच उसाच्या रसातून ऊर्जा मिळते. उन्हात अनेकांना पित्त होतो. उसाच्या रसाचे सेवन केल्यास हा ही त्रास कमी होतो. तसेच उसाच्या रसात कार्बोहाड्रेट, लोह असे घटक असतात जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.

ताक :
उन्हाळ्यात अनेकांना पित्त, अपचन, गॅस होणे अशा समस्या जाणवतात. यावर ताक अत्यंत प्रभावी उपाय ठरू शकतो. ताकामध्ये पचनासाठी चांगले गुणधर्म असल्याने ताक तब्येतीसाठी अतिशय चांगले असते. ताकामध्ये व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, फॉस्फरस असे गुणकारी घटक असतात. उन्हाळ्यात जाणवणाऱ्या लघवीशी संबंधित तक्रारीही ताकामुळे कमी होतात.