पूजा-आरतीच्या वेळी कापराला अनन्यसाधारण महत्व असते. धार्मिक विधींसाठी वापरला जाणारा कापूर आरोग्यासाठी उपयोगी आहे. कापरामध्ये अँटी बॅक्टेरिअल, अँटी फंगल आणि अँटी इनफ्लैमटरी गुणधर्म असतात.औषधांच्या निर्मितीमध्ये कापूराचा वापर केला जातो. कापूर कापरामुळे घर निर्जंतुक होते. जाणून घ्या कापूरचे औषधी फायदे –

वेदना आणि सूज कमी होते
कापरामध्ये दाह आणि जळजळ कमी करण्याची क्षमता असते. एखाद्या ठिकाणी मुका मार लागला असेल तर कापराची पूड करून तेलासोबत त्या भागावर लावा आणि काही मिनीटे तो भाग बांधून ठेवा. यामुळे वेदना आणि सूज कमी होते.

शांत झोप येते
कापराचे तेल उशीवर टाकून झोपल्याने शांत झोप येण्यास मदत होते.

सर्दी-खोकला
गरम पाण्यात कापूर टाकून वाफ घेतल्यास सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो .खोकला झाल्यास मोहरी किंवा तीळाच्या तेलात कापूर मिसळा आणि थोडा वेळ ठेऊन द्या. नंतर या तेलाने छातीवर हलका मसाज करा.

त्वचेवरील पुरळ, घामोळं कमी होण्यास मदत
कापूरमध्ये अँन्टीबॅक्टेरीयल गुणधर्म असतात. यामुळे पुरळ, घामोळं, मुरुमांची समस्या दूर होण्यास मदत होते.पाण्यात थोडं कापराचं तेल मिसळा आणि पुरळ आलेल्या भागावर लावा. यामुळे त्वचेवरील पुरळ, घामोळं, त्वचेचा लालसरपणा कमी होण्यास मदत होते.

वेदनेचा दाह कमी करते
त्वचा भाजल्यामुळे त्वचेला झालेली जखम बरी करण्यासाठी त्वचेवर कापराचे तेल लावावे. कापरामध्ये वेदना कमी करणारे आणि त्वचेचा दाह कमी करणारे गुणधर्म असतात. म्हणूनच अनेक मलम अथवा क्रिममध्ये कापराचा वापर केला जातो.

खाज कमी होते
शरीराच्या कोणत्याही भागावर खाज सुटली असेल, किंवा वारंवार खाजवण्याचा त्रास होत असेल तर खोबरेल तेलामध्ये कापूर टाकून हे मिश्रण खाज सुटलेल्या जागी लावावे.

सांधेदुखी
वेदना होत असलेल्या जागी कापूरचे तेल लावून मालिश करा यामुळे सांधेदुखीच्या वेदना कमी होण्यास मदत होईल.

केसांच्या समस्या
कापूरचे तेल तुमच्या रोजच्या वापराच्या तेलात मिसळून हलक्या हाताने केसांची मालिश केल्याने केस काळेभोर, लांब, मजबूत बनतात. शिवाय केसांतील कोंडाही निघून जातो.

टाचांच्या भेगा
टाचांच्या भेगा घालवण्यासाठी कोमट पाण्यात थोडा कापूर आणि मीठ टाकून त्यात थोडावेळ पाय सोडून बसा. त्यानंतर पाय आणि टाचा स्क्रब करून त्यावर मॉस्चराइजर क्रीम लावा. या उपायाने टाचांच्या भेगा कमी होऊन तळवे मुलायम बनतील.