कोरोनाकाळात अनेकांना विविध आजारांनी ग्रासले होते. आताही अनेकांना आरोग्याच्या काही समस्या जाणवतात. त्यावर उपाय म्हणून घरबसल्या आरोग्य सल्ला मिळवण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाकडून ई- संजीवनी ओपीडी सुरू करण्यात आली होती. आता या ओपीडीमध्ये रुग्णांना घर बसल्या आयुर्वेदिक सल्लाही मिळणार आहे.
सुरुवातीला राज्यातील 150 ते 200 आयुर्वेदिक डॉक्टर आणि जिल्यातील 30 ते 40 आयुर्वेदिक डॉक्टर या उपक्रमात जोडले जाणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त रूग्णांनी या ओपीडीचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे. कोरोनाकाळात आयुर्वेदाकडे अनेक जण वळाले. त्यामुळे केंद्राने ई- संजीवनी ओपीडीमध्ये आयुर्वेदिक सल्ला मिळण्याची व्यवस्था केली आहे. याद्वारे सर्वसामान्यांना मोफत ऑनलाइन उपचार मिळतील. केंद्राच्या कुटुंब कल्याण मंत्रालयाने टेली कम्युनिकेशन द्वारे व ऑनलाइन ओपीडी सेवा सुरू केली आहे.
मागील दोन आठवड्यांपासून रुग्णांना आयुर्वेदिक डॉक्टरांशी संवाद साधण्याची सेवा उपलब्ध झाली आहे. ऑनलाइन ओपीसी सेवा सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध आहे. यासाठी डॉक्टरांनाही विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. इंटरनेटवर ई- संजीवनी ओपीडी असे सर्च केल्यास येणाऱ्या लिंकवर क्लिक करून तुम्ही याबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात.