ऋतुनुसार योगासनामध्ये बदल करावा. उन्हाळ्यात शरीराला आराम आणि थंडावा देणाऱ्या योगासनांचा व्यायामात समावेश करावा. जाणून घ्या उन्हाळ्यात कोणती योगासने करावीत, त्यांचा शरीराला होणारा फायदा आणि करण्याची योग्य पद्धत –

प्राणायाम
कोणत्याही आसनाच्या तुलनेत प्राणायाम उन्हाळ्यात अधिक प्रभावी ठरते. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. सर्वात महत्वाचे म्हणजे प्राणायम ठराविक वेळीच करावा असा काही नियम नाही.

प्राणायाम सुरु करण्याची पद्धत
सर्वात आधी श्वास सोडून द्यावा. नंतर मनात 4 अंक मोजून होईपर्यंत श्वास आत घ्यावा. घेतलेला श्वास 16 अंक मोजून होईपर्यंत श्वास रोखून धरावा. 8 अंक मनात मोजत हळूहळू श्वास बाहेर सोडावा.

मेरुदंडासन
हे आसन केल्यानं पाठ, खांदे, पाय, आणि स्नायू बळकट होतात. तसेच शरीर थंड होते.

आसन करण्याची कृती
योगामॅटवर पाय सोडून बसावे. दोन्ही पाय सरळ आणि ताठ असावेत. आता पायांना गुडघ्यातून वाकवावे.
दोन्ही हातांच्या मदतीचे पायांचे अंगठे पकडा आणि हळुवारपणे पायांना वरती आणताना दोन्ही पाय पसरावे.
दोन्ही पाय ताठ असावे. तसंच हातसुद्धा ताठ असावेत.

उत्तानासन
चयापचय दर आणि शरीरातील उष्णता कमी करण्यास हे आसन उपयुक्त ठरते.

आसन करण्याची कृती
जमिनीवरील आसनावर पावलं जुळवून, पाठीचा कणा ताठ ठेऊन, मान सरळ आणि नजर समोर, असं उभं राहावं.
श्वास घेत हात डोक्याकडे वर नेणं. श्वास सोडत सावकाश कंबरेमध्ये वाकणं.
जमिनीला हात समांतर आले, की मगच डोकं खाली म्हणजे पावलांच्या दिशेनं न्यावं. श्वास सोडत कंबरेच्या वरील संपूर्ण शरीर पायाच्या दिशेनं न्यावं.
कपाळ गुडघ्याला किंवा त्याही खाली नडगीला जाऊन टेकावं. हाताचे पंजे पावलाच्या दोन्ही बाजूला जमिनीवर नेऊन टेकावावेत.
ही आसनस्थिती झाल्यानंतर संथ श्वसन करावं.
आसन एक ते दीड मिनिट स्थिर करावं. श्वास घेत पूर्व स्थितीत येऊन आसन सोडावं.

अर्ध मत्स्येंद्रासन
सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही रिकाम्या पोटी हे आसन करु शकता.

आसन करण्याची कृती
पाय पसरवून बसा, दोन्ही पाय एकत्र ठेवा, पाठीचा कणा सरळ असावा.
डावा पाय वाकवा आणि डाव्या पायाची टाच उजव्या हिपजवळ ठेवा.
उजवा पाय समोर डाव्या गुडघ्याच्या वर ठेवा.
डावा हात उजव्या गुडघ्यावर आणि उजवा हात मागे ठेवा.
कंबर, खांदे आणि मान उजवीकडून वळून उजव्या खांद्यावर बघा.
पाठीचा कणा सरळ ठेवा.
दीर्घ, खोल श्वास घेत ही स्थिती कायम ठेवा.
श्वास सोडताना आधी उजवा हात सोडा, नंतर कंबर, नंतर छाती आणि शेवटी मान.
आरामात सरळ बसा.
दुसऱ्या बाजूने प्रक्रिया पुन्हा करा.
श्वास सोडत परत समोर या.

शवासन
दीर्घ श्वासोच्छवासासह शवासन मज्जासंस्थेला इतर कोणत्याही योगासनापेक्षा अधिक आराम देते. यामुळे शरीराचे तापमान त्वरित कमी होण्यास मदत मिळते.