रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर अनेक आजारांपासून संरक्षण होते. गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. कोरोनावर सध्या कोणतेही ठोस औषध उपलब्ध नाही. त्यामुळे उपचारापेक्षा प्रतिबंध बरा म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढवली पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सकस आहार घेण्याबरोबरच योग्य व्यायाम करणेही गरजेचे आहे. धावणे,चालणे, फिरणे किंवा जिमला जाणे यांसारखे व्यायाम करणे सध्या लॉकडाऊनमूळे शक्य नाही. यावर उपाय म्हणून तुम्ही घरच्या घरी व्यायाम करू शकता त्यासाठी योगा करणे हा उत्तम पर्याय आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ देण्याचे काम योगा करते. त्यामुळेच तुमची रोग प्रतिकारशक्तीही वाढते. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी किमान १० ते २० मिनिट योगा करणे अत्यावश्यक आहे.

योगा शरीराचा आणि मनाचा ताण कमी करण्याचे काम करतात. ताडासन, त्रिकोणासण, उत्कटासन, भुजंगासन, वृक्षासन, मत्स्यासन, सुखासन यांसारखी आसने तुम्ही करू शकता. योगासनांमुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. शरीराची लवचिकता वाढते. नियमित योगासने केल्यामुळे रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार, श्वसनाचे विकार, मानसिक आजार अशा समस्या दूर होण्यास मदत होते. योग केल्यामुळे अल्पावधीत पुरेशी विश्रांती मिळते. काम करण्याचा उत्साह आणि क्षमता वाढते.