कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नसतो. हाच नियम खाण्यापिण्याच्या गोष्टींनाही लागू होतो. लिंबू हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. लिंबाच्या मर्यादित सेवनाने शरीराला अनेक लाभ होतात. मात्र लिंबाचा आहारात अधिक मात्रेत समावेश झाला तर त्याचे शरीरावर घातक परिणाम होतात. जाणून घ्या लिंबाच्या अतिसेवनाने कोणते त्रास होऊ शकतात.
ॲसिडीटी
कोणत्याही आंबट पदार्थांच्या अधिक सेवनामुळे ॲसिडीटीचा त्रास होतोच. आपले शरीर एका वेळी ठरावीक प्रमाणापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी साठवू शकत नाही. त्यामुळे लिंबाच्या अधिक सेवनाने ॲसिडीटी होऊ शकते.
डोकेदुखी, मायग्रेनचा होतो त्रास
लिंबाच्या अतिसेवनामुळे डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास उद्भवू शकतो. आंबट पदार्थांमध्ये टायरामाइन घटक असल्याने, त्याचा अधिक प्रमाणात वापर मेंदूच्या मज्जासंस्थेत तणाव निर्माण करतो. परिणामी डोकेदुखी, मायग्रेन यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
दातांची समस्या
लिंबामध्ये असणाऱ्या ॲसिडमुळे दातांच्या इनॅमल थरावर परिणाम होतो. त्यामुळे दात खराब होऊ शकतात. खबरदारी म्हणून लिंबूपाणी पिल्यानंतर किंवा लिंबाचे पदार्थ खाल्ल्यानंतर ब्रश करणे टाळा. लिंबामुळे दातांना आंबटपणा येऊ शकतो.
त्वचेची समस्या
लिंबूमध्ये ॲसिडीक गुणधर्म मोठ्या प्रमाणात असल्याने यातून त्वचेवर लाल चट्टे, खाज सुटणे यांसारख्या त्वचेच्या समस्या निर्माण होतात.
पोटदुखी
लिंबाचे अतिसेवन केल्याने पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.