० ते ३ वयोगटातील लहान मुलांच्या पोषण आहाराची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. कारण त्यांना पचनशक्ती, शरीरप्रकृतीनुसार आहार देणे गरजेचे असते. याच आहारावर त्यांचा पुढील शारीरिक विकास होतो. तसेच काही खाद्य पदार्थ जरी पौष्टिक असले तरी ते लहान मुलांना पचतील आणि चावता येतील असे नसतात. त्यामुळे जाणून घ्या लहान बाळाला कोणते खाद्यपदार्थ भरवू नयेत याविषयी माहिती –

सुकामेवा
शरीराला पौष्टिक घटक मिळावेत म्हणून अनेक पालकांचा मुलांना सुकामेवा (dryfruits) देण्यावर भर असतो. मात्र लहान मुले व्यवस्थितपणे सुकामेवा खाऊ शकत नाहीत. कारण मुलांच्या दातांची वाढ योग्य पद्धतीने झालेली नसते. त्यामुळे सुकामेवा बारीक चावता न आल्याने तो अन्ननलिकेत अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो लहान मुलांना सुकामेवा दिला तरी तो बारीक कुटून द्यावा.

तेलकट, तिखट, चटकदार पदार्थ
लहान मुलांसमोर तेलकट, तिखट आणि चटकदार पदार्थ कधीही खाऊ नका अथवा त्यांनाही खाण्यास देऊ नका. कारण या पदार्थांमुळे लहान मुलांमध्ये पोटाच्या, श्वसननलिकेच्या, घसादुखीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. शिवाय लहान मुलांना हे चमचमीत पदार्थ खाण्याची सवय लागू शकते. साधे जेवण करण्यासाठी टाळाटाळ करून ते चमचमीत पदार्थ खाण्यासाठी हट्ट करून बसू शकतात. या पदार्थ्यांच्या सेवनाने लठ्ठपणाचीही समस्या निर्माण होऊ शकते.

गाजर, शेंगदाणे, द्राक्षे
घशातून सहज गिळले जातील आणि अन्ननलिकेत अडकणार नाहीत असेच पदार्थ लहान मुलांना खाण्यास द्यावेत. गाजर, काकडी, मुळा, द्राक्षे, शेंगदाणे हे पदार्थ लहान मुलांनी खाण्यास देऊ नये, त्याऐवजी फळांचा ज्यूस, भाज्यांचे सूप किंवा काही पदार्थ बारीक करून खाण्यास द्यावेत.

कोल्ड्रिंक्स
कोल्ड्रिंक्समध्ये शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक नसतात. तसेच साखर, सोडा, आम्ल आणि इतर शरीराला हानिकारक असणारे घटक असतात. त्यामुळे लहान मुलांच्या दातांचे आणि आतड्याचे नुकसान होऊ शकते. हाडे आणि दात ठिसूळ आणि दुर्बल बनू शकतात. दातांवरचा एनॅमलचा थर कोल्ड्रिंक्सच्या अति सेवनामुळे कमी होतो. कोल्ड्रिंक्समध्ये साखरेचं प्रमाण जास्त असल्याने रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण वाढतं. त्यामुळे मुलांमध्ये कोल्ड्रिंक्सच्या अतिसेवनाने वजन वाढून लठ्ठपणा येण्याची शक्यता वाढते.

अति गोड पदार्थ
लहान मुलांना गोड पदार्थ मापातच द्यावेत. अन्यथा गोड पदार्थ खाण्याची सवय लागल्याने दात खराब होऊ शकतात. स्थूलता पण वाढू शकते.

तांदळाचे पाणी
आजकाल सर्वच तांदूळ चांगले असतील याची खात्री देता येत नाही. तसेच तांदळाच्या पाण्यात अर्सेनिक असू शकते. तांदळाचे पाणी अधिक पिल्याने उलट्या, मळमळ, डोकेदुखी, पोटदुखी होऊ शकते.