पुणे : आजच्या धकाधकीच्या जीवनात कधी कोणाला ही हृदयविकाराचा झटका येवू शकतो, त्यामुळे हार्टअॅटक प्रसंगी वेळीच उपचार मिळण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेला कार्डियाक किट सोबत बाळगणे आजची काळाची गरज आहे, असा सल्ला प्रसिध्द हार्ट स्पेशलिस्ट डॉ. सुनिल अग्रवाल यांनी दिला आहे.
हृदयविकारानंतर जगभरात जास्त मृत्यू पहिल्या एक दोन तासांत योग्य उपचार वेळेत न मिळाल्याने होतात. हृदयविकाराचा झटका आल्यास सबंधित व्यक्तीला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेणे व त्या दरम्यान प्रथमोपचार मिळणे हे अतिशय महत्त्वाचे ठरते. त्यामुळे 40 टक्के पेशंटचे प्राण वाचू शकतात .हार्टअॅटक प्रसंगी उपयोगी पडावे, या उद्देशाने बनविण्यात आलेल्या कार्डियाक किट संर्दभात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. सुनिल अग्रवाल बोलत होते.
स्ट्रेसने भरलेल्या जीवनात जंकफुडने ग्रासलेल्या फास्ट लाईफमध्ये अनेक आजार वाढत आहे. त्यामुळेच आलेल्या सर्व आजारांचा सरळ परिणाम हार्ट म्हणजे हृदयावर पडतो आणि हार्टअॅटकचा सामना करावा लागतो. तसेच हार्टअॅटक आल्यावर दवाखान्यात जाण्यापर्यंत रुग्णाला आपला जीव गमवावा लागतो. या गोष्टीचा अभ्यास करून आपली सामाजिक बांधिलकी जपत ओम मेडिकल फाऊंडेशन आणि इंटरनॅशनल लायन्स कल्ब यांच्या संयुक्त विद्यमानाने हार्टअॅटक प्रंसगी उपयुक्त ठरणारे कार्डियाक किट तयार करण्यात आले असून आतापर्यंत सुमारे पाच हजार पेक्षा अधिक कार्डियाक किटचे मोफत वितरण करण्यात आले आहे.
या कार्डियाक किटचा हार्टअॅटक प्रसंगी वापर केल्यास रुग्णाला दवाखान्यात घेवून जाण्याच्या कालावधीत त्याची हृदयविकाराची तीव्रता कमी करण्यास मदत करतो आणि यामुळे रुग्णाला काही वेळ मिळतो जेणे करून डॉक्टरांना उपचार करण्यास वेळ मिळतो. यामुळे काही रुग्णांचा जीव वाचविण्यास मदत होवू शकते. म्हणूनच प्रत्येक नागरिकांने कार्डियाक किट आपल्या सोबत जवळ बाळगावे असा सल्ला डॅा. सुनिल अग्रवाल यांनी दिला. पत्रकार परिषदेत डॉ. अशोक अग्रवाल उपस्थित होते.
डॉ. अशोक अग्रवाल म्हणाले, सध्याचे उदाहरण घ्या प्रसिध्द अभिनेता पुनीत राजकुमार आणि सिध्दार्थ शुल्का जे शरीराने धष्टपुष्ट होेतेच आणि आपल्या हेल्थचा पुरेपुर लक्ष ठेवत होते परंतू त्यांना जेव्हा हार्टअॅटक आला त्यावेळी त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांना आपला जीव गमावावा लागला. पुर्वी हार्टअॅटक हा 50 वर्षा पुढील व्यक्तींना येत होता. आता हे चित्र बदलले असून वयाची मर्यादा न राहता हार्टअॅटक कोणत्याही वयातील व्यक्तीस येत आहे. त्यामुळे हा कार्डियाक किट अमृत ठरणार आहे, असेही अग्रवाल म्हणाले.