हिरव्या पालेभाज्या म्हणलं की मेथी, पालक यांसारख्या भाज्यांची नावे घेतली जातात. यामध्ये शेपूची भाजी नेहमीच दुर्लक्षित राहते. इतर पालेभाज्यांच्या तुलनेत या भाजीच वैशिष्ट्ये म्हणजे या भाजीचा जास्त प्रमाणात वास येतो. काही जणांना या भाजीचा वास आवडतो तर काही जण भाजीच्या वासामुळे भाजी खाणे टाळतात. असे असले तरी शेपू ही पालेभाजी तिच्यातील पोषक घटकांमुळे आरोग्यासाठी खूप महत्वपूर्ण असते. शेपूमध्ये मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, फायबर,प्रोटीन, कॅलरीज, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन, लोह, व्हिटॅमिन, कॅल्शिअम हे पोषक घटक असतात. जाणून घ्या शेपूची भाजी खाण्याचे फायदे –

पोटाच्या समस्यांवर गुणकारी
शेपूची भाजी खाल्ल्याने पचनसंस्था व्यवस्थित राहते. तसेच पोट साफ होणे, पोट दुखणे, पोट फुगणे, बद्धकोष्ठेतेचा त्रास यांसारख्या समस्या कमी होतात.

शांत झोप येते
शेपूमध्ये फ्लेवोनाईड्स आणि व्हिटॅमिन B हे घटक असतात जे तुमचे मन आणि मेंदू शांत ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे शांत झोप येण्यास मदत होते.

मासिक पाळीच्या समस्या कमी होतात
शेपूची भाजी हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करते. त्यामुळे मासिक पाळी वेळेत येण्यास मदत होते. मासिक पाळीत पोट दुखणे, रक्तस्राव अनियमित असणे यांसारख्या समस्या कमी होतात.

हाडे मजबूत होतात
शेपूमध्ये कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.

रक्तदाब आणि हृदयाचे कार्य सुरळीत राहते
शेपूच्या भाजीमुळे वाईट कोलेस्ट्राल शरीरातून कमी होते आणि शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉलची वाढ होते. त्यामुळे रक्तदाब आणि हृदयाचे कार्य सुरळीत चालते.