नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हंटले जाते. या झाडाच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग आहे, म्हणून या झाडाला कोकणात कल्पवृक्ष मानतात. या झाडापासून मिळणारे फळ म्हणेजच नारळही अतिशय बहुगुणी आहे. पाणी असलेल्या नारळाला शहाळं म्हणतात. नारळ पाणी पिण्याचे जबरदस्त आणि आश्चर्यकारक फायदे आहेत. नारळ पाणी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सकाळ आणि सायंकाळ ही वेळ नारळ पाणी प्यावे. कारण या काळात शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते. चला तर मग जाणून घेऊ नारळ पाणी पिण्याचे फायदे-
रोगप्रतिकारशक्ती वाढते, शरीराची झीज भरून निघते
नारळ पाण्यात पुरेसे पोषक घटक आणि व्हिटॅमिन्स असतात. याचा परिणाम प्रतिकार शक्तीवर होतो. नारळ पाण्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते आणि आजारपणातून लवकर बरे होण्याचे बळ मिळते. शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी नारळपाणी उपयोगी ठरते.
पचनशक्ती सुधारते
अन्नाचे पचन करण्यासाठी शरीराला पाण्याची गरज असते. नारळ पाण्यामध्ये पोटॅशिअम आणि इतर अनेक मिनरल्स असतात. नारळ पाणी थंड असल्यामुळे शरीरात अपचन, पित्तामुळे होणारी जळजळ कमी होते. तसेच नारळ पाण्यामुळे तुमच्या शरीराची पचनशक्ती सुधारते.
कॅलरीज वाढण्याची चिंता नाही
नारळ पाण्यात साखरेचे प्रमाणही कमी असते. शिवाय नारळ पाण्यात कार्बोहायड्रेट कमी असते. त्यामुळे नारळ पाणी प्यायल्याने शरीरातील जास्त कॅलरीज वाढत नाहीत.
त्वचा टवटवीत आणि चमकदार बनते
शरीराला पुरेसे पाणी मिळाले नाही तर डिहायड्रेशन होते. याचा तुमच्या त्वचेवर परिणाम होतो. डिहायड्रेशनमुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. शिवाय डोळ्याखाली काळी वर्तुळे निर्माण होतात. तुम्ही नियमित नारळपाणी प्यायला तर त्वचेचं योग्य पोषण होतं. त्वचेला व्हिटॅमिन सी आणि अँटी ऑक्सिडंट मिळतात. ज्यामुळे त्वचा टवटवीत आणि चमकदार होते. नारळाचे पाणी व दूध त्वचेच्या क्लििझगसाठीही उपयुक्त ठरतात
केस मजबूत आणि चमकदार होतात
नारळ पाणी पिण्याचा फायदा केसांसाठीही होतो. नारळ पाण्यातील पोषक घटकांमुळे केस मजबूत आणि चमकदार होतात. तसेच केसांच्या मुळांना चालना मिळाल्यामुळे केसांची वाढ होते आणि केस गळणे थांबते. केसांमध्ये पुरेसा मऊपणा आणि ओलावा येतो. केसांना पोषण मिळाल्यामुळे केसात कोंडा होण्याची समस्या कमी होते.
फ्रेश आणि उत्साही वाटते
नारळपाणी हे नैसर्गिक गोड आणि मधुर चवीचे असते. शिवाय त्यामध्ये कॅलरिज, कार्ब्स आणि फॅट खूपच कमी असतात. शहाळ्यातील पाणी थेट पिण्यामुळे पटकन फ्रेश आणि उत्साही वाटते.
रक्तदाब कमी होतो
नारळ पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या होती त्यांच्यावर नारळपाण्याचा उपचार केल्याने चांगला परिणाम झाल्याचं एका संशोधनानुसार समोर आलं. तसेच नारळपाण्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असते. ज्यामुळे तुमच्या रक्तादाबावर नियंत्रण मिळवणं सोपं जातं.
व्यायामानंतर शरीराला पुरेशी ऊर्जा लगेच मिळते
व्यायाम केल्यानंतर लगेच शरीराला उर्जा आणि शक्ती मिळवायची असेल तर नारळ पाणी प्यावे. व्यायाम केल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाईट कमी होतात ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होते. मात्र नारळ पाण्यामध्ये भरपूर इलेक्ट्रोलाईट आणि मिनरल्स असल्यामुळे तुमच्या शरीराला पुरेशी ऊर्जा लगेच मिळते. नारळपाण्यात पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, सोडिअम आणि कॅल्शिअमही असतात. याचा चांगला फायदा व्यायामानंतर टवटवीत वाटण्यासाठी करता येऊ शकतो.
किडनीस्टोनपासून बचाव
किडनीस्टोन अथवा मूतखडा हा अन्नकणांमधील सोडिअम आणि इतर घटकांपासून तयार होत असतो. या पदार्थांमुळे युरिनमध्ये क्रिस्टलसारखे कण जमा होतात आणि त्यापासून मूतखडा तयार होतो. मात्र नारळपाण्यामुळे हे कण मूत्रमार्गात निर्माण होणे रोखता येते. तसेच मूतखडा विरघळण्यासही मदत होते.
ह्रदयाचे कार्य सुधारते-
नारळपाणी प्यायल्याने ह्रदयाचे विकार होण्याचा धोका टाळता येऊ शकतो. कारण काही संशोधनानुसार नारळपाणी प्यायल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी झाले असं आढळून आलेलं आहे. त्यामुळे ज्यांना ह्रदयाच्या आरोग्याबाबत चिंता वाटत आहे त्यांनी नियमित नारळपाणी पिण्यास काहीच हरकत नाही.