बटाटा जितका स्वादिष्ट आहे, तितकाच तो पौष्टिकही आहे. बटाट्याचा वापर करून त्वचेचे सौंदर्य खुलवता येते. तसेच त्वचेच्या अनेक समस्यांवर बटाटा गुणकारी आहे. जाणून घ्या बटाट्याचे सौंदर्यवर्धक फायदे –

चेहरा स्वच्छ करण्यासाठी
चेहरा स्वच्छ करण्यासाठी बटाट्याचा एक चमचा रस, दोन चमचे लिंबू रस आणि दोन चमचे मुलतानी माती एकत्र करून फेसपॅक तयार करा आणि १० मिनिटे चेहऱ्यावर ठेवून नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा.

ब्लीच
बटाट्याचा वापर करून त्वचा नैसर्गिकरित्या ब्लीच करता येते. बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून चेहर्‍यावर लावावा आणि हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे ब्लीच होऊन चेहरा उजळ दिसतो.

चेहर्‍यावरील डाग
चेहर्‍यावरील काळे डाग कमी करण्यासाठी बटाट्याचा रस काढून त्याने चेहर्‍यावर मसाज करावे आणि अर्ध्या तासाने चेहरा धुवून घ्यावा.

डार्क सर्कल
डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे दूर करण्यासाठी बटाट्याच्या चकत्या काढून डोळ्यावर ठेवाव्यात.

हातांची त्वचा मुलायम आणि नरम बनविण्यासाठी
हातांना नरम आणि गोरे बनवण्यासाठी बटाट्याचा मास्क बनवता येतो. त्यासाठी बटाट्याला स्वच्छ धुवून त्याला बारीक करून घ्या. त्यात ३-४ चमचे दूध घाला. जेवढे दूध घातले आहे तितकेच पाणी पण मिसळा. या मिश्रणाचा लेप तयार होईल. हा लेप अर्धा तास हातांवर लावून ठेवा. याने हातांची त्वचा मुलायम आणि नरम होईल.

त्वचेचा तेलकटपणा घालवण्यासाठी
त्वचेचा तेलकटपणा घालवण्यासाठी बटाट्याचा रस आणि टोमॅटो रस एकत्र करावे आणि चेहरा चांगला स्वच्छ करून त्यावर लावावा. याने चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर होईल.

चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी
चेहर्‍यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी बटाट्याच्या रसात कापूस बुडवून तो कापूस फ्रिजमध्ये ठेऊन तो चेहर्‍यावर फिरवावा. ते तसेच २० मिनिटं राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. असे रोज केल्याने काही दिवसातच चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
बटाट्यामध्ये जीवनसत्व क असते. जे त्वचेसाठी फायद्याचे असते. हे क जीवनसत्व कोलाज तयार करते ज्यामुळे सुरकुत्या पडत नाही.