स्पुतनिक व्ही ही लस भारतात मंजुरी मिळालेली तिसरी कोरोना प्रतिबंधात्मक लस आहे. या लसीची किंमत भारतात जाहीर झाली असून ही लस भारतात 995.4 रुपयांना मिळणार आहे. या लसीची मूळ किंमत 948 रुपये प्रति डोस आहे त्यामध्ये 5 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. अशी माहिती डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज कडून मिळाली आहे. तसेच भारतात या लसीचे उत्पादन सुरु झाले की या लसीची किंमतही कमी होण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे. स्पुटनिक व्ही लसच्या आयात डोसची पहिली खेप 1 मे रोजी भारतात आली आणि 13 एप्रिलला भारतात आपातकालीन वापरासाठी या लशीला मंजुरी देण्यात आली.

रशियात तयार झालेली स्पुतनिक लस पुढील आठवड्यात भारतीय बाजारांत उपलब्ध होईल अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य असलेले डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे.
देशात कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्र सरकार लस उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व मार्ग तपासून पाहत आहेत त्या अनुषंगाने स्पुतनिक व्ही लसीच्या वापरला मान्यता देण्यात आली आहे. लसची पहिली तुकडी 1 मे रोजी भारतात पोहोचली. परंतु ही लस वापरात येण्यापूर्वी तेव्हा ती पूर्णपणे सुरक्षित आहे याची खात्री करुन घ्यावी असेही निर्देश आरोग्य मंत्रालयाने दिले होते. मर्यादित प्रयोगिक तत्त्वावरील वापरासाठी तसेच सॉफ्ट लॉन्चिंगचा भाग म्हणून आज लसीचा पहिला डोस हैदराबादमध्ये देण्यात आला.