पुणे : फोनवरूनच रूम भाड्याने घेत असल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी भाडे व डिपॉझिट ऑनलाईन देण्याची तयारी दर्शवली अन् एका महिलेला तब्बल १ लाखाला गंडा घातला आहे. याप्रकरणी रास्ता पेठेतील ३० वर्षीय महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांची खराडी येथे रुम आहे. त्यांना ती भाड्याने द्यायची आहे. त्यांना अनोळखी व्यक्तीने फोन केला. तुमची रुम भाड्याने घेण्यासाठी तयारी असल्याचे सांगितले. ऑनलाईन डिपॉझिट पाठवित असल्याचे सांगून त्यांच्याकडून बँकेची गोपनीय माहिती काढून घेतली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ९९ हजार ९९० रुपये काढून घेऊन त्यांची फसवणूक केली. सदर प्रकरणाचा पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत.

चोरी करण्यासाठी आता विविध युक्त्या वापरल्या जात आहेत. शहरात सायबर चोरटे सक्रिय झाले आहेत. सायबर चोरटे वेगवेगळ्या माध्यमांतून सामान्यांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन माध्यमातून व्यवहार करताना खबरदारी घ्यावी. बँकेची गोपनीय माहिती कोणालाही शेयर करू नये.