पूर्वी अनेकवेळा डोळे येण्याची साथ पसरायची. आताच्या काळात वैद्यकीय सुविधा वाढल्याने तसेच लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाल्याने डोळे येणे या आज़राचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले आहे. एका व्यक्तीच्या डोळ्यांचे इन्फेक्शन दुसऱ्या व्यक्तीला डोळ्यांना होऊन साथ पसरते. डोळ्यांचा हा संसर्ग ४-५ दिवस राहतो. या आजाराविषयी अनेक गैरसमज देखील प्रचलित आहेत. डोळे आलेल्या व्यक्तीकडे पाहिल्याने आपल्याही डोळ्यांना इन्फेक्शन होते, एकदा डोळे येऊन गेल्यास परत येणार नाही असे अनेक चुकीचे समज अजूनही लोकांच्या मनात आहे.

डोळे येण्याची कारणे

डोळे येण्याचे बहुतांशी कारण व्हायरस किंवा बॅक्टरीयामुळे हेच असते. मात्र काही वेळा रासायनिक पदार्थ, प्रखर प्रकाशकिरण, ऍलर्जी यामुळेही डोळे येतात. सर्दी झाल्यास देखील डोळे येऊ शकतात.

डोळे आल्याची लक्षणे

डोळे आल्यानंतर डोळे लालसर दिसतात.
डोळ्यांना खाज येते, डोळे जळजळतात.
डोळ्यांना उजेड सहन होत नाही.
डोळ्यांच्या आतील ग्रंथींना सूज येते.
डोळ्यात काहीतरी टोचल्यासारखे दुखू लागते.
डोळ्यांतून सतत चिकट पाणी वाहते.
सर्वात महत्वाचे म्हणजे झोपेतून उठल्यावर डोळ्यांच्या पापण्या एकमेकांना चिकटून बसतात. यामुळे खूप त्रास जाणवतो.
काहींना तर घसा दुखणे, सर्दी, ताप या देखील समस्या उद्भवतात.

डोळे आल्यानंतर काय काळजी घ्यावी

डोळ्यांना इन्फेक्शन झालेल्या व्यक्तीने गॉगल वापरावा.
डोळ्यांना इन्फेक्शन झालेल्या व्यक्तींनी डोळे कोमट किंवा थंड पाण्याने स्वच्छ करावेत.
डोळे चोळू नयेत.
डोळे हातांनी न पुसता स्वच्छ रुमालाने पुसावेत.
डोळ्यांना इन्फेक्शन झालेल्या व्यक्तींनी वापरलेल्या वस्तू हाताळू नये. उदा. कपडे, रुमाल, गॉगल, मोबाईल, आयड्रॉप्स
डोळ्यांना इन्फेक्शन झालेल्या व्यक्तीने इन्फेक्शन बरे होत नाही तोपर्यंत लोकांमध्ये मिसळणे टाळावे.
विशेष म्हणजे डोळे आल्यानंतर लोकांचा सल्ला ऐकून घरगुती उपाय करू नयेत. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.