नाचणीला काही भागात नागली असे म्हणतात. तर इंग्रजीत रागी किंवा फिंगर मिलेट म्हणतात. नाचणीत भरपूर कॅल्शियम असते. तसेच फायबर, कर्बोदके, लोह, व्हिटामिन सी, व्हिटामिन बी, अँटिऑक्सिडेंट्स आणि प्रथिने यासारखे अनेक पोषक घटक असतात. नाचणी आरोग्यवर्धक तसेच सौंदर्यवर्धकही आहे. नाचणीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे तीव्र सूर्यकिरणांपासून त्वचेचे संरक्षण होते. नाचणी वापरुन त्वचेच्या अनेक समस्यांवर उपाय करता येतात. तसेच नाचणी फेसपॅक लावल्यास चेहरा मुलायम होऊन चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. जाणून घ्या नाचणीचा फेसपॅक कसा बनवायचा आणि नाचणी फेसपॅकचे फायदे –
असा बनवा फेसपॅक
पद्धत १
नाचणी पिठामध्ये दूध आणि गुलाबपाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्यावर आणि मानेवर लावा.
सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. आठवड्यातून दोनदा हा फेसपॅक लावल्यास त्वचा चमकदार व मऊ होईल.
पध्दत २
एका वाटीत नाचणीचे पीठ, दही आणि मध घ्या. ते चांगले मिसळा. नंतर यात लिंबाचा रस मिसळा. सर्व साहित्य एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटे सुकू द्या. त्यानंतर थंड पाणी अथवा कोमट पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून २-३ वेळा नाचणीचा हा फेसपॅक लावल्याने त्वचेच्या समस्या कमी होऊन त्वचा सुंदर बनते.
नाचणीचा फेसपॅक लावण्याचे फायदे
नाचणीतील फिनोलिक ॲसिड त्वचेच्या पेशींची दुरुस्ती करून त्यांना मजबूत करते.
नाचणीमध्ये आढळणारे अमीनो ॲसिड आणि फ्लेव्होनॉइड्स कोरडी त्वचा मॉइश्चराइज ठेवतात .
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
चेहऱ्याच्या त्वचेवरील मृतपेशी सहज काढता येतात.
चेहऱ्याच्या त्वचेचे छिद्र स्वच्छ होऊ लागतात आणि ब्लॅकहेड्सची समस्या देखील दूर होते.
त्वचेवर वेळेपूर्वी सुरकुत्या येण्याची समस्या टाळता येते.