डाळिंब हे व्हिटॅमिन सी आणि बी यांचा चांगला स्रोत आहे. डाळिंबांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, सेलेनियम आणि जस्त असतात. नियमित डाळिंबाचे सेवन करणे आरोग्यासाठी गुणकारी आहे. विशेष करून डाळिंब मधुमेह आजारावर फायदेशीर आहे. जाणून घ्या डाळिंब खाण्याचे आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक फायदे –
‘या’ कारणांसाठी मधुमेहींनी नियमितपणे खावे डाळिंब
i ) इन्सुलिन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखर कमी करण्यासाठी डाळिंब उपयुक्त आहे.
ii ) मधुमेहींनी नियमितपणे डाळिंबाचे सेवन केले किंवा त्याचा रस प्यायल्यास अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात. मधुमेहींची रक्तशर्करा जास्त असल्याने त्यांना स्नायू दुखणे आणि थकवा येणे हा त्रास होतो. ही वेदनादायक लक्षणे कमी करण्यासाठी देखील डाळिंबाचे सेवन उपयुक्त आहे.
iii ) मधुमेहाच्या रुग्णांना उच्च कर्बोदकांनी युक्त अन्न टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण ते लवकर पचतात आणि त्यांचे साखरेत रूपांतर होते. त्यामुळे रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. पण डाळिंबात कर्बोदकांचे प्रमाण खूपच कमी असते.
iv ) डाळिंबाचा रस प्यायल्याने मधुमेहाच्या रुग्णांमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते. रक्तातील साखरेच्या उच्च पातळीमुळे उद्भवणाऱ्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी गुंतागुंत टळते.
अशक्तपणा कमी होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते
अशक्तपणा दूर करण्यासाठी डाळिंब गुणकारी आहे. व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डाळिंबाचा रस पिऊ शकता.
रक्ताभिसरण क्रिया सुधारते
हृदय निरोगी ठेवायचे असेल तर नियमित डाळिंब खा. डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यास मदत होते.
स्मरणशक्ती वाढते
डाळिंबामुळे शरीरातील रक्त तर वाढतेच, पण स्मरणशक्ती देखील वाढते.
रक्तदाब नियंत्रित
डाळिंबामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
पोटाचे विकार कमी होतात
डाळिंबात फायबर आणि अनेक पोषक घटक आढळतात, जे पचनशक्ती वाढवण्यास मदत करतात. बद्धकोष्ठता किंवा जळजळ होण्याची समस्या असेल तर डाळिंब खाणे खूप फायदेशीर आहे.जर तुम्हाला अपचन, गॅस, पोट साफ न होणे अशा समस्या असतील तर आहारामध्ये डाळिंबाचा समावेश करणे गरजेचे आहे.
सूज कमी होते
डाळिंबामध्ये अनेक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात. डाळिंबाच्या रसात इतर फळांच्या रसापेक्षा अधिक अँटी-ऑक्सिडेंट असतात. त्याचे सेवन केल्याने पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण होऊ शकते. तसेच सूज कमी होते.
हिमोग्लोबिनची पातळी संतुलित राहते
डाळिंबाचे नियमित सेवन केल्यास शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते. ज्या लोकांच्या शरीरात हिमोग्लोबिनची पातळी संतुलित असते, त्यांच्या चेहर्यावर कायमच चमक पाहायला मिळते.
त्वचेसाठी गुणकारी
i ) डाळिंबाच्या सेवनामुळे त्वचेवर नैसर्गिक तेज येण्यास मदत मिळते.
ii ) डाळिंबामध्ये लोह, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस, मॅग्नीज, सेलेनियम, व्हिटॅमिन्स आणि फॅटी अॅसिड्स असतात. निरोगी आणि नितळ त्वचेसाठी हे पोषक घटक आवश्यक आहेत. तसंच शरीरात रक्ताची निर्मिती करण्याचे आणि शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत सुरू ठेवण्याचंही कार्य हे घटक करतात.
हे सर्व घटक त्वचेच्या पेशींची निर्मिती जलदगतीने करण्याचे कार्य करतात. नुकसान झालेल्या पेशी दुरुस्ती देखील करतात.
iii ) दररोज एक डाळिंब खाल्ल्याने त्वचेमध्ये कोलेजनची योग्य प्रमाणात निर्मिती होते. कोलेजन एक विशेष प्रोटीन आहे, ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते आणि त्वचा सैल पडत नाही. यामुळे त्वचेमध्ये नवीन पेशींची निर्मिती होण्यासही मिळते.
iv ) डाळिंबाच्या सेवनामुळे तुमच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाची लक्षणे दिसत नाहीत. कारण यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्सचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. हे घटक हानिकारक घटकांपासून त्वचेचे संरक्षण करतात. त्वचा सैल पडणे, सुरकुत्या इत्यादी समस्या देखील दूर होतात.
टीप : कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांनी डाळिंबाचा रस कमी प्रमाणात प्यावा. अतिसाराचा त्रास होत असेल तर डाळिंबाचा रस सेवन करू नये.