उन्हाळा ऋतूत आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहार आणि पेय आजाराला निमंत्रण देतात. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढवणारे किंवा डिहायड्रेट करणारे पदार्थ अति खाणे टाळले पाहिजेत. जाणून घ्या उन्हाळ्यात कोणते पदार्थ खाणे टाळावेत याविषयी माहिती –
तळलेले पदार्थ (Fried Foods)
उन्हाळ्यात शरीराला गोष्टी पचायला जास्त वेळ लागतो. अशा स्थितीत तळलेल्या पदार्थांचे सेवन करू नये. त्यामुळे पॅटीज, फ्राईज, पिझ्झा आणि बर्गर इत्यादी खाणे टाळा.
तसेच तळलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने त्वचा तेलकट बनते. त्यामुळे चेहऱ्यावर मुरुम आणि पुरळ दिसू लागतात.
आईस्क्रीम (Ice cream)
आईस्क्रीममध्ये फॅट आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, जे पचन होताना आपल्या शरीराला अधिक गरम करते. त्यामुळे शरीरात जास्त उष्णता निर्माण होते. आईस्क्रीमचे सेवन केल्याने घसा खवखवणे आणि ताप येणे अशा समस्या देखील निर्माण होऊ शकतात. यावर पर्याय म्हणजे घरगुती आईस्क्रीमचे सेवन करावे, बाहेरील आईस्क्रीम अति खाण्याचा मोह टाळावा.
मसालेदार अन्न (Spicy food)
उन्हाळ्यात अधिक मसालेदार अन्न खाऊ नये. त्यामुळे अपचनही होऊ शकते. मिरचीमुळे पित्त आणि शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळे जास्त घाम येतो आणि डिहायड्रेशनच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
अति मांसाहार (Non vegetarian food)
मांसाहारी पदार्थ पचायला जास्त वेळ लागतो. उन्हाळ्यात मांसाहाराच्या अतिसेवनाने पचनक्रियेवर ताण पडतो. यामध्ये फॅट, प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, जे पचन होताना शरीराला गरम करते.याच्या सेवनामुळे जास्त घाम येतो आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
आंब्याचे अधिक प्रमाणात सेवन करणे (mangoes)
आंब्यामध्ये नैसर्गिक साखर मुबलक प्रमाणात असते आणि त्याचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्वचेला संसर्ग होऊ शकतो आणि शरीरातील उष्णता वाढू शकते. याशिवाय जुलाब, पोटदुखी आणि डोकेदुखीच्या तक्रारीही वाढू शकतात.