रात्री निवांत लागली तरच सकाळी उठल्यावर ताजतवानं, समाधानी आणि आनंदी वाटतं. मात्र शांत झोप मिळाली नाही तर चिडचिड होऊन जाते. आजारपण, ताण-तणाव, दिवसभरात अंग मेहनतीची कामे न करणे, अवेळी झोपणे, अनेक वेळा कॉफी अथवा चहा पिणे यांसारखी अनेक कारणे झोप न येण्यासाठी कारणीभूत असतात. कधीकधी हीच सवय निद्रानाशाचे कारण बनते. माणसाला कमीतकमी सात ते आठ तास शांत झोपेची गरज असते. जाणून घ्या शांत झोप लागण्यासाठी उपाय –

वेळेवर झोपा
रोज झोपेची वेळ पाळण्याचा प्रयत्न करा. लवकर झोपून लवकर उठण्याची सवय लावावी.

झोपण्याआधी अंघोळ करा
रात्री झोपण्याआधी अंघोळ केली तर तुम्हाला रात्री शांत आणि निवांत झोप लागू शकते. गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे रिलॅक्स वाटेल तसेच दिवसभराचा थकवा दूर होऊन शांत झोप येण्यास मदत होईल.

सवयी बदला
झोपताना नेहमी सकारात्मक विचार करूनच झोपा. झोपताना एखादे आवडीचे पुस्तक वाचा, घरातील व्यक्तींशी गप्पा मारा. झोपण्याच्या आधी किमान १५-२० मिनिट टीव्ही, मोबाइल पाहणं टाळा.

व्यायाम करा
दिवसभर मेहनतीचे काम नसेल तर व्यायाम अवश्य करा. तसेच रात्री जेवण झाल्यावर शतपावली करा.

हलका आहार घ्या
रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तास आधी जेवा. रात्री झोपताना जड आहार घेऊ नका. कारण त्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर ताण येतो आणि झोप लागत नाही.

मेडीटेशन, प्रार्थना करा
झोपताना मनात चांगले विचार असतील तर चांगली झोप लागते. चिंता,काळजीचे विचार तुम्हाला रात्री झोपू देत नाहीत. यासाठी झोपण्यापूर्वी प्रार्थना अथवा मेडीटेशन करा ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील आणि शांत झोपदेखील लागेल.