अनेकजण एका जागी बसून काम करतात. त्यामुळे त्यांच्या शरीरातील चरबी वाढते. महत्त्वाचं म्हणजे महिलांना स्वत:कडे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यामुळे वाढत्या वयासोबत पोटाची चरबीही वाढायला लागते. मग काय करावं हे समजत नाही.

चला तर मग आज आम्ही तुम्हाला सोपी आसनं सांगणार आहोत. ज्यासाठी फक्त दहा मिनिटांचा वेळ लागतो. सकाळी फक्त दहा मिनिटं ही आसनं करा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल.

भुजंगासन
सगळ्यात आधी पोटावर झोपा. नंतर तुमचे हाताचे तळवे खांद्याखाली ठेवा मग पाय एकत्र ठेवा अन् पायाची बोटे जमिनीवर राहू द्या. या स्थितीत श्वास रोखून धरा. मग डोके, खांदे आणि तुमचं धड वर नेण्याचा प्रयत्न करा. नाभी जमिनीवर राहिली आहे, खांदे रुंद आहेत आणि डोके किंचित वर आहे का हे तपासून पाहा. कमीत कमी दहा सेकंद अशा स्थितीत राहा. मग हळूहळू श्वास सोडा.

धनुरासन
पोटावर झोपा. नंतर पाय वाकवून त्याच्या घोट्याला पकडा. मग श्वास घेत शरीराचा वरचा भाग आणि खालचे शरीर वर उचलण्याचा प्रयत्न करा. नंतर हनुवटी वरच्या दिशेने वळवा. आता हळूहळू श्वास सोडत आसनही हळूच सोडा.

सर्पासन
सुरूवातीला पोटावर झोपा. नंतर तळवे इंटरलॉक करा. म्हणजे ते दोन्ही मांड्यांच्या खाली राहू द्या. श्वास रोखून धरा. आता पुढील शरीराचा भाग तसाच जमिनीवर टेकलेला राहू द्या अन् मागचा भाग उचलण्याचा प्रयत्न करा. हे करत असताना पाय जमिनीवर राहतील हे लक्षात राहू द्या. दहा ते पंधरा सेकंद अशाच स्थितीत राहा. मग आसन सोडा.