आजकाल बैठी जीवनशैली आणि फास्टफूडचे गरजेपेक्षा अधिक सेवन यामुळे शरीरात चरबी साठण्याचे प्रमाण वाढले आहे. पोटावर अनावश्यक चरबी साठल्यास शरीर बेढब दिसतेच शिवाय पोटावर अतिरिक्त असणाऱ्या चरबीमुळे शरीराला हालचाल करताना त्रास होतो. भुजंगासन आणि नौकासन या योगासनांच्या नियमित सरावामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते तसेच शरीरही लवचिक बनते. जाणून घ्या भुजंगासन आणि नौकासन कशा प्रकारे करावे.
१) भुजंगासन
पोटावरील आणि मांडीवरील चरबी घटवण्यासाठी भुजंगासन लाभदायक आहे. तसेच भुजंगासन नियमित केल्याने छाती, खांदे मान आणि मस्तिष्काचा भाग सुदृढ आणि मजबूत होतो, तसेच शरीर सुडौल बनते, पाठदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
टीप – गर्भवती महिला तसेच हर्निया, अल्सर, तीव्र गुडघे दुखीचा त्रास असणाऱ्यांनी भुजंगासन करू नये.
भुजंगासन आसन करण्याची पद्धती
चटईवर किंवा योगा मॅटवर पालथं झोपा. दोन्ही पाय सरळ आणि ताठ ठेवा तसेच दोन्ही पायांचा एकमेकांना स्पर्श केलेला असावा. आता दोन्ही हात छातीच्या जवळ ठेवा. कपाळ जमिनीला लावा. त्यानंतर हळुवारपणे शरीराचा वरील भाग वर उचलावा.
शरीराचा वरील भाग वर उचलताना श्वास घ्यावा. नंतर मागे बघावं. आता स्थितीत नियमित श्वासोच्छ्वास ठेवावा. दोन्ही हात कोपरातून थोडे वाकवावेत. भुजंगासनामध्ये जेवढे शक्य आहे तेवढेच शरीर वर उचलावे. शरीराचा वरील भाग खाली घेताना श्वास सोडावा.
२) नौकासन
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी नौकासन सर्वोत्तम आसन आहे. या आसनाच्या नियमित सरावामुळे पाठीच्या व पोटाचे स्नायू मजबूत बनतात. तसेच हर्निया सारखे आजार होत नाहीत.
नौकासन आसन करण्याची पद्धती
सर्व प्रथम पोटावर झोपा. पाय जुळलेले असावेत. हात शरीराजवळ ठेवा.
पूर्ण श्वास सोडावा आणि श्वास घेत दोन्ही हात आणि पाय एकाचवेळी जमिनीपासून ३० अंश वर उचलावे. याच स्थितीत अर्धा ते १ मिनिट थांबा.
हळूहळू पूर्वस्थिती या.