‘डोंगरची काळी मैना’ म्हणून प्रसिद्ध असलेले करवंद हे फळ उन्हाळा ऋतूमध्ये येते.करवंदाच्या औषधी गुणांमुळे हे फळ रक्तवाढीसाठी आणि रक्तशुद्धीसाठी, पोटाच्या विकारांवर, डोळ्यांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी, पित्तावर, उष्णतेचा त्रास कमी कमी करून शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी गुणकारी आहे. उन्हळ्यात या फळाचा सरबत पिणेही आरोग्यासाठी लाभदायक असते. जाणून घ्या करवंदांचा सरबत कसा बनवावा.

 

करवंदाचे सरबत

पद्धत १

करवंदांचा चीक जाण्यासाठी गरम पाण्यात ती १० मिनिटे बुडवून ठेवा. पाण्यातून काढून घ्या. त्यातून बिया वेगळ्या करा.
करवंदाचा गर, साखर, मीठ आणि एक वाटी पाणी मिक्सरला वाटून घ्या. गाळणीने किंवा पातळ कापडाने गाळून घ्या.
एक वाटी रसाला तीन वाट्या पाणी मिसळा. पाणी, साखर, मीठ चवीनुसार वाढवा.

पद्धत २

करवंदाची फळे स्टीलच्या पातेल्यात चांगली कुस्करून घ्यावीत.
नंतर हे पातेले मंद आचेवर ठेवून १० मिनिटे गरम करावे व थंड होऊ द्यावे. नंतर लगदा बारीक करावा. त्यातून रस काढावा.
आणि हा रस पातळ मलमलच्या कापडातून गाळून स्टीलच्या उभट भांड्यांमध्ये ५-६ तास ठेवावा.
तयार झालेला रस हवाबंद करून थंड जागी साठवावा.

पद्धत ३

१०० मिली करवंदाचा रस घेऊन त्यात १५० ग्राम साखर २.५ ग्राम आम्ल आणि अर्धा लिटर पाणी मिसळावे.
तयार झालेले सरबत निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून हवाबंद करून कोरड्या व थंड जागी साठवावे.
टीप – सरबत तयार करण्यासाठी रस १० टक्के, साखर १५ टक्के आणि आम्लता ०.३० टक्के असावी.