उन्ह्याळ्यात येणारे जांभूळ हे हंगामी फळ औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. जांभळाची फळं, पानं, साल आणि बिया सर्वच गोष्टी औषधी आहेत. चवीने गोड, थोडीशी आंबट व तुरट असणाऱ्या जांभूळामध्ये लोह, कॅल्शियम, प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात. जाणून घेऊयात जांभूळ फळाचे औषधी, आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक फायदे

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
जांभळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. तसेच जांभळात कॅलरीज खूप कमी असतात. म्हणून वजन कमी करण्यासाठी जांभूळ उपयुक्त आहे.

डायबेटीजवर गुणकारी
जांभूळ डायबेटीजवर आजारावर अतिशय गुणकारी आहे. जांभळामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. जांभळाच्या बिया सुकवून त्याची पावडर पाण्यातून घेतल्यास रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राखले जाते, रक्तातील साखर नियंत्रित होते.

पोटांचे विकार
पचनसंस्थेचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आणि पोटाच्या समस्यांवर जांभूळ गुणकारी आहे. जर अपचन आणि पोटदुखीचा त्रास असेल तर जांभळाचा रस प्या. त्यामुळे अपचन आणि पोटदुखीच्या त्रासापासून आराम मिळतो.

हृदयविकारापासून संरक्षण करते
जांभळात मोठ्या प्रमाणात पोटॅशिअम असल्यामुळे हृदयविकारावर जांभूळ फायदेशीर ठरते. जांभळामध्ये अनेक खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असल्याने ते तुमचे रक्तदाब, उच्च रक्तदाब, स्ट्रोक आणि इतर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. जांभूळ शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियमित ठेवण्यास मदत करते.

डोळ्यांचे आरोग्य सुधारते
जांभळाचा रस पिण्यामुळे नजर सुधारते. जांभळामुळे शरीरातील डोळ्यांना कनेक्ट होणारे सर्व टिश्यूज आणि डोळ्यातील कॉर्निया निरोगी राहतो. डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारा व्हिटॅमिन सीचे जांभूळ हे मुख्य स्त्रोत आहे.

रक्त शुद्ध होते
जांभूळ खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होते. जांभूळ फळामध्ये लोहाचं प्रमाण खूप असते. त्यामुळे रक्त शुद्ध होते.

त्वचेसाठी फायदेशीर
जांभळामध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे रक्त शुद्ध राहण्यास मदत होते. परिणामी त्वचेचे आरोग्य आणि पोत सुधारतो.
जांभळामधील गुणधर्म मुरुम, डाग, सुरकुत्या आणि पिंपल्स होण्यापासून देखील प्रतिबंधित करते.

वेदना व सुजेवर गुणकारी
जांभळाच्या पानांचे तेल औषधी असते. विंचू चावल्यास पानांचा रस काढून विंचू चावलेल्या जागी लावावे, वेदना व सूज नाहीशी होते.

टीप– रिकाम्या पोटी आणि अति प्रमाणात जांभूळ खाऊ नका, यामुळे पित्त होऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे कच्ची जांभळं कधीच खाऊ नयेत.

मदर डेअरीचे दूध महागले

घरगुती स्क्रब कसे बनवावेत