माझं आरोग्य टीम ः धकाधकीची नित्यक्रम, मोबाइल व अन्य डिवाइसचा वाढलेला अतिवापर आणि आता वाढती उष्णता यामुळे अनेकांच्या झोपेवर परिणाम झाला असून रात्री शांत आणि लवकर झोपणे हे आव्हानच झाले आहे. परंतु या अपुऱ्या झोपेमुळे आपल्याला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पुरेशी आणि योग्य वेळी झोपणे आवश्यक आहे. त्यासाठी तज्ज्ञ काही उपायही सांगतात. त्यातील 4 सोप्पे उपाय आपण पाहूयात. (4 simple remedies for better deep sleep at night)

1. झोप लागण्यासाठी या सवयी उत्तम
रात्री झोपताना अनेकांना पुस्तक वाचणे, झोपण्यापूर्वी अंघोळ करणे, ध्यान करणे अशा सवयी असतात. यामुळे मन शांत होऊन विचारही नियंत्रणात राहतात. त्यामुळे या सवयी रात्री झोपण्यासाठी उत्तम असून याचा रोज अवलंब केल्यास शांत आणि पटकन झोप येण्यास मदत होईल. शिवाय झोपण्यापूर्वी मोबाइल व अन्य डिवाइसचा वापर टाळल्यास लवकर झोप लागेल.

2. बेडरूम थंड ठेवा
ज्या खोलीत झोपतो तेथील तापमान थंड ठेवल्याने आपल्याला पटकन झोप लागण्यास मदत होईल. उन्हाळ्यात रात्री बऱ्याचदा गरम होते. त्यामुळे दिवसा बेडरूमच्या खिडक्या बंद ठेवून त्या रात्री झोपण्यापूर्वी उघडा. त्यामुळे बेडरूममध्ये हवेच्या थंड झुळूक येतील. याशिवाय बेड आणि अंधरून नीट टाका. उन्हाळ्यात शक्यतो कापूस किंवा हलक्या कापडाच्या अंधरूणावर झोपा. त्यामुळे गरम होणार नाही. व चांगली शांत झोप लागेल.

3. कॉफी, अल्कहोलचे सेवन टाळा
कॉफी आणि अल्कहोलमुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढून झोप बिघडते. त्यामुळे रात्री कॉफी, अल्कहोलचे सेवन टाळले पाहिजे. सायंकाळी हर्बल टीचे सेवन व रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर पाणी पिल्यास लवकर झोप लागण्यास फायदा होईल.

4. झोपण्याची एकच वेळ ठेवा
झोपण्यासाठी एकच वेळ ठेवणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. रोज आपण ज्या वेळी झोपणार आहोत, सुट्टीच्या दिवशी त्याच वेळी झोपण्याची सवय ठेवा. शिवाय उठण्याची वेळही नक्की करा. याशिवाय घरात बेडरूममध्ये किंवा झोपत असलेल्या खोलीत खिडक्यांना पडदे लावा.

(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही)